पुणे : संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहीलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील ६ विधानसभा मतदासंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या लोकप्रतिनीधींकडून शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या समर्थकांना धमक्या देत अर्वाच्य शिवागाळ केली जात असल्याचा आरोप आमदार रोहीत पवार यांनी केला आहे. दरम्यान, सुळे यांच्या वकिलांकडून १५० हून अधिक गंभीर तक्रारी करण्यात आल्या आहेत. बूथ कॅप्चरींग, मतदारांना खुलेआम पोलिस संरक्षणात पैसे वाटप करणे. पोलिंग बूथवर दारू पिऊन धमकाविणे, शिवागाळ करणे, मतदारांना मतदान केंद्रावर जाण्यास मज्जाव करणे, धक्काबुक्की व मारहाण केल्याच्या गंभीर तक्रारी अधिकृत ई मेलद्वारे करण्यात आल्या आहेत.
इंदापूरातील अंथुर्णे गावात आमदार दत्तात्रय भरणे यांच्याकडून मतदारांना अर्वाच्च शिवीगाळ करत असल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमावर व्हायरल झाला. आमदार रोहीत पवार यांनी त्यांच्या अधिकृत अकाऊंटवरून दोन व्हिडीओ प्रसारीत केले. विश्वसनीय सुत्रांच्या माहितीनुसार, रोहीत पवार यांच्यासोबत वकिल प्रांजल आगरवाल यांनी सुळे यांच्या अधिकृत ई मेल आयडीवरून निवडणूक आयोग, मुख्य निवडणूक अधिकारी व पोलिस प्रशासनाला तक्रारी दाखल केल्या आहेत.
आणखी वाचा-भोर-वेल्ह्यात मतदानाला दुपारनंतर गर्दी… किती टक्के झाले मतदान?
कविता द्विवेदी, बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी म्हणाल्या, ” आम्हाला ज्या काही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्याचीच शहानिशा करून योग्य ती कारवाई केली जाईल. दरम्यान, भोर येथे पैसे वाटपाच्या तक्रारीनंतर पुढील कारवाई सुरू आहे. खडकवासला मतदारसंघात ईव्हीएम पूजन केल्याविरोधात संबधित व्यक्तींविरोधात कारवाई केली जाईल.”