पुणे : यंदाच्या पुणे पुस्तक महोत्सवात पुस्तकांच्या २५ लाखांहून अधिक प्रती विकल्या गेल्या असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या महोत्सवात पुस्तक विक्री चौपटीने वाढून ४० कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा दावा आयोजकांकडून करण्यात आला. राष्ट्रीय पुस्तक न्यासतर्फे फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर १४ ते २२ डिसेंबर या कालावधीत पुणे पुस्तक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. गेल्या नऊ दिवसांपासून सुरू असलेल्या या महोत्सवाचा रविवारी समारोप झाला. गेल्या वर्षीच्या महोत्सवात पुस्तकांची २५० दालने होती आणि सुमारे ११ कोटी रुपयांची उलाढाल झाली होती. यंदा सहाशेपेक्षा अधिक पुस्तक दालने होती. महोत्सवात साहित्यिक, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल, बालचित्रपट महोत्सव, स्पर्धा, कार्यशाळा असे विविध उपक्रम झाले. विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी महोत्सवातील कार्यक्रमांमध्ये भाग घेतला. पुणेकरांनी या महोत्सवाला भरभरून प्रतिसाद दिला.

समारोपाच्या कार्यक्रमात महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे म्हणाले, ‘महोत्सवाला सुमारे १० लाख लोकांनी भेट दिली. एक हजारांपेक्षा जास्त लेखक महोत्सवात सहभागी झाले. पुस्तकांद्वारे चार विश्वविक्रम नोंदवले गेले. पंचवीसहून अधिक सांस्कृतिक कार्यक्रम झाले. शंभरपेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झाली. पहिल्यांदाच झालेल्या ‘पुणे लिट फेस्ट’मध्ये अनेक मान्यवरांचा सहभाग होता. पुस्तक विक्रीतून सुमारे ४० कोटी रुपयांची उलाढाल झाली. पुणे पुस्तक महोत्सव हा सामूहिक प्रयत्नांचा आविष्कार आहे. आता या उपक्रमाचे चळवळीत रुपांतर झाले पाहिजे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सहकार्याने ‘लेखक वाचक संवाद’ हा उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबवला जाणार आहे.’

हेही वाचा…उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारचा नवा उपक्रम; १ ते १५ जानेवारी दरम्यान होणार काय?

‘तरुण वाचत नाहीत, हा समज खोटा’

‘महोत्सवाला मिळालेल्या प्रतिसादामुळे ऊर्जा वाढली आहे. आता हा महोत्सव केवळ पुण्याचा राहिलेला नाही, तर राज्यभरातून लोक महोत्सवाला येतात. यात तरुणांचा सहभाग फार मोठा आहे. तरुणांनी आवर्जून पुस्तके खरेदी केली. त्यामुळे आजचे तरुण वाचत नाहीत हा समज खोटा ठरला आहे,’ असेही राजेश पांडे यांनी सांगितले.

Story img Loader