प्राप्तीकर विभागाकडून चौकशीनंतर कारवाई होणार
नोटाबंदीच्या काळात अडीच लाखांपेक्षा जास्त रक्कम बँकेच्या खात्यात भरणाऱ्या नागरिकांची चौकशी सुरू करण्यात आली असून, पिंपरी-चिंचवडमधील तीनशेहून अधिक कोटय़धीशांनी नोटाबंदीच्या काळात संशयास्पद व्यवहार केल्याची माहिती समोर आली आहे. या सर्वाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत संशयास्पद व्यवहार करणाऱ्या २३ जणांवर आयकर विभागाकडून छापे टाकण्यात आले आहेत.
एक हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा ८ नोव्हेंबर रोजी चलनातून बाद करण्यात आल्यानंतर अनेक नागरिकांनी दिलेल्या मुदतीमध्ये जुन्या नोटा बदलून घेतल्या होत्या. मात्र, काही नागरिकांनी जुन्या नोटा बदलताना मोठय़ा रकमेचे व्यवहार केले. अडीच लाखांपेक्षा जास्त रकमेचे व्यवहार करणाऱ्या नागरिकांवर आयकर विभागाने लक्ष केंद्रित केले होते. पहिल्या टप्प्यात कोटय़वधी रुपयांचे संशयास्पद व्यवहार करणाऱ्या नागरिकांची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती अशी माहिती आयकर विभागाच्या सूत्रांकडून मिळाली आहे.
पिंपरी-चिंचवडमधील तीनशेपेक्षा जास्त नागरिकांनी एक कोटीपेक्षा जास्त रकमेच्या पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बदलून घेतल्या आहेत. त्यामुळे या सर्व नागरिकांची चौकशी सुरू झाली आहे. आतापर्यंत २३ जणांवर छापे टाकण्यात आले असून त्यांनी केलेल्या व्यवहारांमध्ये आक्षेपार्ह बाबी आढळून आल्या आहेत.
त्यामुळे त्यांच्यावर ५० टक्के दंड भरण्याची कारवाई होऊ शकते.आयकर चुकवून नोटा बदलणाऱ्या नागरिकांची ऑनलाइन माहिती घेण्यात येणार आहे. आयकर भरला आहे का, पैशाचा किंवा उत्पन्नाचा स्रोत काय आहे, अशीही चौकशी केली जाणार आहे. त्याबाबत समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत, तर कारवाई करण्यात येणार आहे.
कर न भरता संशयास्पद व्यवहार करणाऱ्या नागरिकांनी ३१ मार्च २०१७ पर्यंत पंतप्रधान गरीब कल्याण निधीमध्ये निर्धारित दंड भरला, तर त्यांना कारवाईमधून सूट देण्यात येणार आहे.
पुढील काळातही व्यवहारांवर लक्ष राहणार
नोटाबंदीच्या काळातील संशयास्पद व्यवहारांबरोबरच जनधन खात्यामध्ये पैसे भरून जुन्या नोटा बदलून घेतलेल्यांवरही लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. नोटाबंदीच्या काळातच नव्हे, तर यापुढेही अडीच लाखांपेक्षा जास्त रक्कम बँक खात्यात भरणाऱ्या नागरिकांवर, तसेच पाच लाखांपेक्षा जास्त रक्कम भरणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यांचीही आयकर विभागाकडून चौकशी केली जाणार आहे. बेनामी संपत्ती जमा करणाऱ्यांवरील कारवाईला आयकर विभागाने सुरुवात केली आहे.