पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयांतील अकरावीच्या ३३ हजार जागा यंदा रिक्त राहिल्या आहेत. आता प्रवेश प्रक्रिया संपल्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील ३१९ कनिष्ठ महाविद्यालयात यंदा १ लाख ११ हजार ९९० जागा प्रवेशासाठी उपलब्ध होत्या. त्यासाठी १ लाख ७ हजार ९६३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. केंद्रीय प्रवेश प्रक्रियेसाठी उपलब्ध असलेल्या ९६ हजार ४३५ जागांसाठी ७६ हजार ४९ अर्ज आले होते. तर ७८ हजार ९२४ विद्यार्थ्यांनी केंद्रीय प्रक्रियेद्वारे प्रवेश घेतला. राखीव कोट्यांतर्गत असलेल्या १५ हजार ५५५ जागांवर १० हजार २२० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. राखीव कोट्याच्या ५ हजार ३३५, तर केंद्रीय प्रक्रियेच्या २७ हजार ७३१ जागा मिळून एकूण ३३ हजार ६६ जागा रिक्त राहिल्या आहेत.
पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह मुंबई, नाशिक, अमरावती, नागपूर महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबवण्यात आली. या अंतर्गत तीन नियमित फेऱ्या, तीन विशेष फेऱ्या, दैनंदिन गुणवत्ता फेऱ्या राबवण्यात आल्या. तसेच २६ सप्टेंबर ते २१ ऑक्टोबर या कालावधीत दैनंदिन गुणवत्ता फेरी राबवण्यात आली. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर यांनी अकरावीची प्रवेश प्रक्रिया संपल्याची माहिती दिली.