पुणे: राज्यभरात डोळे येण्याच्या साथीचे रुग्ण वाढत आहेत. पुण्यातही ही साथ फैलावली असून, दररोज पाचशेहून अधिक रुग्ण आढळत आहेत. पुणे महापालिकेच्या हद्दीत आतापर्यंत डोळ्याच्या साथीचे ११ हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे डोळ्यांची काळजी घेण्याचा सल्ला नेत्रतज्त्रांनी दिला आहे.
शहरात ऑगस्टच्या सुरुवातीपासून डोळे येण्याची साथ वाढू लागली आहे. पुणे महापालिकेच्या हद्दीत सोमवारी (ता. २१) ५७१ रुग्ण आढळले. शालेय मुलांमध्ये संसर्गाचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे महापालिकेकडून शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांची तपासणी केली जात आहे. आरोग्य विभागाने सोमवारपर्यंत एकूण ११ हजार ७९४ रुग्णांची नोंद केली आहे, अशी माहिती महापालिकेचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर यांनी दिली.
हेही वाचा… पुणे : दहशत निर्माण करण्यासाठी सोशल मीडियात रिल्स प्रसारित करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी शिकवला धडा
डोळे येण्याची साथ प्रामुख्याने ॲडिनो विषाणूमुळे येते. एखाद्या व्यक्तीला संसर्ग झाल्यानंतर २ ते १४ दिवसांत लक्षणे दिसून येतात. हा संसर्ग २८ दिवसांपर्यंत राहतो. सर्वसाधारणपणे लक्षणे दिसू लागल्यानंतर सुमारे १३ दिवसांच्या आत बहुतांश रुग्ण बरे होतात. ॲडिनो विषाणूच्या उपप्रकारांनुसार संसर्गाची तीव्रता दिसून येते. संसर्गाची तीव्रता अधिक असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरते, असा सल्ला नेत्रतज्ज्ञांनी दिला.
काय काळजी घ्यावी?
- हाताने डोळ्याला स्पर्श करणे टाळा
- एकमेकांच्या वस्तूंचा वापर टाळा
- ओलसर कापडाने डोळे स्वच्छ करा
- डोळे आल्यास कॉन्टॅक्ट लेन्सचा वापर थांबवा
- त्रास अधिक वाढल्यास नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घ्या
डोळे येण्याची साथ व्यक्तीच्या एका डोळ्यापासून सुरू होते आणि नंतर दुसऱ्या डोळ्याला संसर्ग होतो. काही दिवसांत हा संसर्ग आपोआप बरा होतो. मात्र, रुग्णांना जास्त त्रास होऊ लागल्यास डॉक्टरांकडून उपचार करून घ्यावेत. – डॉ. प्रदीप डहाळे, नेत्रतज्ज्ञ, मणिपाल हॉस्पिटल, बाणेर