अधिकृत ११ हजार, प्रत्यक्षात ३५ हजार रिक्षा; प्रवाशांच्या धोकादायक वाहतुकीकडे दुर्लक्ष

पिंपरी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) कार्यक्षेत्रामध्ये अकरा हजार आठशे सत्तर रिक्षांची नोंदणी झाली आहे. प्रत्यक्षात मात्र तीस ते पस्तीस हजार रिक्षा शहरात अनधिकृतपणे प्रवासी वाहतूक करतात. नोंदणी नसलेल्या रिक्षांवर वाहतूक पोलीस आणि आरटीओकडूनही कारवाई केली जात नाही. अनधिकृत आणि धोकादायक स्थितीत रिक्षांमधून प्रवासी वाहतूक होत असली तरी प्रशासनाकडून लक्ष दिले जात नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.

राज्यात जुलै २०१७ पासून मागेल त्याला रिक्षा परवाना देण्याच्या मुक्त धोरणाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. प्रत्यक्ष अंमलबजावणीला सुरुवात झाल्यापासून पिंपरीत तीन हजार २१६ रिक्षा चालकांना परवाना देण्यात आला आहे, तर ६ हजार ४७० नवीन रिक्षांची नोंदणी पिंपरी आरटीओ कार्यालयाकडे झाली आहे.

परवाना मुक्त धोरणाच्या आधी पिंपरी-चिंचवडमध्ये रिक्षा चालविण्याचे परवाने अतिशय मर्यादित होते. परंतु त्यावेळीही रिक्षांची संख्या भरमसाठ होती. नवीन आणि जुन्या रिक्षांची नोंदणी केवळ ११ हजार ८७० आहे. परंतु प्रत्यक्षात ३० ते ३५ हजार रिक्षा रोज प्रवासी वाहतूक करतात. बेकायदा आणि आरटीओकडे नोंदणी नसलेल्या रिक्षा प्रवासी वाहतूक करत आहेत आणि रिक्षा चालविणारे चालकही अल्पवयीन आणि परराज्यातील असल्याचे चित्र सध्या शहरामध्ये दिसून येत आहे.

पिंपरी आरटीओ कार्यालयामध्ये सध्या दहा ऐवजी वीस रिक्षा परवान्याचा दैनंदिन कोटा ठरविण्यात आला आहे. त्यानुसार रोज वीस रिक्षांचे परवान्याचे वितरण करण्यात येते. त्यामुळे भविष्यात परवानाधारक रिक्षांची नोंदणी वाढणार आहे. परंतु सध्या सुरू असलेल्या बेकायदेशीर रिक्षा प्रवासी वाहतुकीकडे आरटीओ आणि वाहतूक पोलिसांची कारवाई होत नसल्याने राजरोसपणे रस्त्यावर बेकायदा रिक्षा प्रवासी वाहतूक करत आहेत. आरटीओ आणि वाहतूक पोलीस दोघेही मनुष्यबळाचे कारण देऊन हात झटकत आहेत.

भंगार झालेल्या रिक्षा तोडल्यानंतरच नवीन रिक्षांना परवाना दिला जातो. त्यामुळे परवान्याशिवाय जास्त रिक्षा प्रवासी वाहतूक करत असतील तर त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. इतर जिल्ह्य़ातून आलेल्या रिक्षांवर वाहतूक पोलीस आणि आम्ही संयुक्तपणे कारवाई करत आहोत. अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या शंभर रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत. ही कारवाई यापुढेही सुरूच ठेवण्यात येणार आहे.

– आनंद पाटील, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी

पिंपरी-चिंचवड शहरातील ३० ते ३५ हजार रिक्षांची नोंदणी आरटीओ कार्यालयाकडे नाही. अशा रिक्षांवर कारवाई करावी अशी मागणी वेळोवेळी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे प्रामाणिक रिक्षा चालकांवर अन्याय होत आहे.

– श्रीधर काळे, अध्यक्ष, क्रांती रिक्षा संघटना, पिंपरी-चिंचवड

Story img Loader