पुणे : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) प्रवेशासाठी खासगी शाळांमध्ये राखी २५ टक्क जागांसाठीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत तीन लाख ६६ हजार ५४८ पालकांनी अर्ज दाखल केले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अर्जांची संख्या साधारण ८० हजारांपेक्षा अधिक असून आता पालकांचे लक्ष प्रवेशाच्या सोडतीकडे लागले आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत अर्जसंख्या वाढल्याने प्रवेश प्रक्रियेत चुरस होणार असल्याचे दिसून येत आहे.
आरटीई अंतर्गत आर्थिक आणि वंचित घटकांतील मुलांचे २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत अर्ज करण्याची मुदत शनिवारी संपली. राज्यातील आठ हजार ८२८ शाळांमधील एक लाख १ हजार ९६९ जागांसाठी ३ लाख ६६ हजार ५४८ पालकांनी आपल्या मुलांच्या प्रवेशासाठी अर्ज भरले आहेत. त्यामुळे यंदाच्या प्रवेश प्रक्रियेत उपलब्ध जागांच्या साडेतीन पटपेक्षा अधिक अर्ज दाखल झाले आहेत.
हेही वाचा >>> हाॅकी खेळताना झालेल्या वादातून महिला आणि तीन मुलींना मारहाण; तीनजण अटकेत
आरटीई प्रवेश प्रक्रियेत अर्जांची पडताळणी होऊन, साधारण एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात ‘एनआयसी’मार्फत प्रवेशाची सोडत जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यानंर पालकांना नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर मुलाच्या प्रवेशाबाबात मेसेज पाठवण्यात येईल. त्याचप्रमाणे पालक आपल्या अर्जाचा क्रमांक आणि पासवर्ड टाकूनही मुलाच्या प्रवेशाची स्थिती जाणून घेऊ शकतात. प्रवेश जाहीर झालेल्या मुलांचा प्रवेश घेण्यासाठी पालकांना पुरेसा कालावधी देण्यात येईल, असे प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून सांगण्यात आले.