चिंचवड येथील मोरया गोसावी मंदिराच्या परिसराला जलपर्णीचा वेढा पडला आहे. सातत्याने तक्रार करूनही या समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याने भाविकांमध्ये पालिकेच्या कारभाराबद्दल तीव्र संताप आहे. यासंदर्भात, स्थानिक नगरसेविका अश्विनी चिंचवडे यांनी आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांना दिलेल्या निवेदनात आंदोलनाचा इशारा दिला आहे.
पर्यावरण विभागाचे अधिकारी कोणताही विषय गांभीर्याने घेत नाहीत. जलपर्णीविषयी सातत्याने सांगूनही ते दुर्लक्ष करत आहेत, त्यामुळे मंदिरालगतच्या नदीपात्रात जलपर्णीचा गालिचा तयार झाला आहे. परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. चिंचवडचा गणपती व मोरया साधू यांच्या समाधीच्या दर्शनासाठी राज्याच्या विविध भागांतून भाविक येतात. नदीतील पाणी तीर्थ म्हणून ते पितात, अशा अवस्थेत नदीतील प्रदूषण पाहता त्यांना काय वाटत असेल, असा मुद्दा चिंचवडे यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात उपस्थित केला आहे. या विषयात लक्ष घालावे, पर्यावरण विभागाच्या बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी चिंचवडे यांनी आयुक्तांकडे केली आहे, अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे.