मोकळ्या भूखंडांमुळे प्राधिकरणात स्वच्छतेचा प्रश्न, नागरिकांच्या आरोग्याला बाधा
पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने मोकळ्या भूखंडाच्या संरक्षणासाठी संरक्षक भिंती बांधल्या आहेत. मात्र या भूखंडांमध्ये उगवलेल्या काटेरी झाडा-झुडपांमुळे आणि तिथे साचलेल्या राडारोडय़ाने डासांचे प्रमाण वाढले आहे. नागरी वस्तीमध्ये असलेले हे भूखंड कोणी स्वच्छ करायचे याबाबत महापालिका आणि प्राधिकरणामध्ये ताळमेळ नाही. त्यामुळे रिकामे भूखंड असलेल्या भागातील नागरिकांच्या आरोग्याला बाधा येत आहे.
प्राधिकरणाच्या १ ते ४२ पेठा आहेत. या पेठांमध्ये विकसित न झालेले शेकडो भूखंड रिकामे आहेत. या रिकाम्या भूखंडावर काही ठिकाणी अतिक्रमणे झाली आहेत तर काही भूखंडांमधील मुरुमाची चोरी झाली. त्यामुळे प्राधिकरण प्रशासनाने या भूखंडांना संरक्षक भिंती बांधण्यास सुरुवात केली. उद्यान, शाळा, रुग्णालय तसेच इतर प्रायोजनासाठी या भूखंडांवर आरक्षणे दर्शविण्यात आली आहेत. तसेच काही नागरिकांनी भूखंड मंजूर होऊनही त्यावर बांधकामे केलेली नाहीत. भूखंडाला संरक्षक भिंती बांधण्यात आल्या असल्या, तरी हे भूखंड आता नागरिकांच्या आरोग्याला घातक ठरू लागले आहेत. रिकाम्या भूखंडात गवत, काटेरी झाडे वाढत आहेत. तसेच नागरिक तेथे राडारोडाही टाकत आहेत. त्यामुळे या भूखंडांमध्ये पाणी साचत आहे. भूखंडाच्या दुरवस्थमुळे रिकामे भूखंड असलेल्या भागात दरुगधी पसरून डासांचे प्रमाण वाढले आहे. स्थानिक नागरिकांनी प्राधिकरण आणि महापालिका प्रशासनाकडे अनेक वेळा तक्रार करूनही हा प्रश्न कायम
आहे.
प्राधिकरणाचे मोकळे भूखंड स्वच्छ करण्याची मागणी महापालिका अधिकाऱ्यांकडे केल्यानंतर त्यांनी हात झटकले आहेत. ते प्राधिकरणाच्या मालकीचे भूखंड असल्यामुळे ते स्वच्छ करण्याची जबाबदारी प्राधिकरणाचीच असल्याचे महापालिका आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. तर प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी महापालिका कर घेते. त्यामुळे स्वच्छतेचे काम त्यांनी करणे अपेक्षित आहे. प्राधिकरणाकडे स्वच्छता साफ-सफाई करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा नाही, अशी भूमिका घेतली आहे. प्राधिकरण आणि महापालिका यांच्यातील वादात सामान्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महापालिका आणि प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडे रिकामे भूखंड स्वच्छ करण्यासाठी अनेक वेळा पाठपुरावा केला. मात्र एकमेकांकडे बोट दाखवले जाते.
अजय सायकर, स्थानिक नगरसेवक

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mosquito increase due to garbage lying in pcntda open land