दोन महिन्यांपूर्वी हवेत जिथे पाहावे तिथे घोंघावणारी चिलटेच चिलटे असल्याचा अनुभव पुणेकरांनी घेतला होता. अनेक दुचाकीचालकांना या चिलटांनी वाहन चालवताना डोळ्यांसमोर घोंघावून अगदी हैराण करून टाकले होते. तीच परिस्थिती आता पुन्हा उद्भवली आहे. फरक फक्त इतकाच, की ही चिलटे मागील वेळच्या चिलटांपेक्षा लहान आहेत.
गेल्या २-३ दिवसांपासून हवेत उडणाऱ्या लहान-लहान चिलटांची संख्या अचानक वाढली आहे. नदीकाठचे रस्ते, महापालिका, डेक्कन परिसर, शास्त्री रस्ता, सारसबाग परिसर या भागात काही ठिकाणी तर या चिलटांचा उपद्रव प्रचंड वाढला आहे. सतत तोंडासमोर घोंघावणाऱ्या चिलटांना उडवताना नागरिक त्रासले आहेत. काही दिवसांपूर्वी पडून गेलेल्या पावसानंतरचे आणि तीव्र उन्हाळा सुरू होण्यापूर्वीचे सध्याचे वातावरण चिलटांच्या पैदाशीला पोषक ठरले आहे. प्राणिशास्त्रज्ञ डॉ. हेमंत घाटे म्हणाले, ‘‘सध्या दिसणारी चिलटे म्हणजे वादळी पावसानंतर हवेतील आद्र्रतेमुळे निर्माण झालेल्या पोषक वातावरणाचा परिणाम आहे. दोन महिन्यांपूर्वी शहरात ‘अॅफिड’ या प्रकारची चिलटे मोठया प्रमाणावर दिसली होती. हे कीटक नेहमीच्या चिलटांपेक्षा आकाराने किंचित मोठे आणि काहीसे ढेकणासारखे दिसणारे होते. सध्या दिसणाऱ्या चिलटांमध्ये अॅफिड्सच्या काही प्रजाती आहेतच पण त्यात प्रामुख्याने ‘कायरोनॉमस’ ही चिलटे आहेत. कायरोनॉमस हे कीटक डासांचे जातभाई असतात. मात्र ते डासांसारखे चावत नाहीत. या चिलटांचे आयुष्य एक दिवसांचे असून ती पाण्यात अंडी घालून मरून जातात. त्यांच्यामुळे आरोग्याला कोणताही त्रास होत नाही. सातत्याने कडक ऊन सुरू झाल्यावर चिलटांचा उपद्रव संपेल.’’
 ‘पुण्याच्या भोवताली शेतीत करण्यात आलेले काही पीकबदल आणि सोयाबीन पिकाचा वाढलेला टक्का यामुळे अॅफिड कीटकांचा उपद्रव वाढला असल्याची शक्यता आहे, मात्र याबाबत संशोधन होणे बाकी आहे,’ असेही घाटे यांनी सांगितले.

Story img Loader