आपल्या कार्यालयात भंगार वस्तू साठल्यात? त्यात पाणी साठून डास निर्माण व्हायची शक्यता आहे?.. मग वेळीच सावध व्हा! पुणे महापालिकेतर्फे कार्यालयांत डासांची पैदास होणाऱ्या जागा आढळल्या तर कडक कारवाई करण्यात येणार आहे.
ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये वाढलेल्या डेंग्यूच्या प्रादुर्भावाच्या पाश्र्वभूमीवर महापालिकेने प्रतिबंधात्मक मोहीम हाती घेतली आहे. याअंतर्गत फेब्रुवारीपासून सरकारी आणि खासगी कार्यालये, सोसायटय़ा आदी ठिकाणी डासांची पैदास होणे कसे टाळावे, याबाबत प्रबोधन करण्यात येत आहे.
शासकीय आणि निमशासकीय कार्यालये, खासगी संस्था, वर्कशॉप्स या ठिकाणी डासांची पैदास होऊ शकणाऱ्या जागा निर्माण होऊ नयेत यासाठी त्या- त्या कार्यालयांतर्फे एका व्यक्तीची नेमणूक करण्यात येणार आहे. या कार्यालयांत निकामी टायर, भंगार वस्तू साठून राहू नयेत यासाठी ही व्यक्ती देखरेख करेल. विद्युत विभागातील नादुरूस्त दिवे, डांबर विभागातील रिकामे बॅरल तसेच अतिक्रमण विभागातील साहित्यातही पाणी साठू नये यावरही देखरेख करणाऱ्या व्यक्तीे त्या- त्या विभागातर्फे नेमल्या जातील.
इतके करूनही या कार्यालयांत डासांची पैदास होणाऱ्या जागा आढळल्या तर नेमलेल्या व्यक्तींवर कडक कारवाई करण्याची महापालिकेची योजना आहे. यात संबंधित व्यक्तीला नोटिसा देणे, दंडात्मक कारवाई किंवा खटले भरण्याचा समावेश असणार आहे. या जबाबदार व्यक्तींच्या नेमणुकीसाठी कार्यालयांकडून माहिती भरून घेण्याचे काम सुरू झाले आहे. महापालिकेच्या सहायक आरोग्य अधिकारी आणि कीटक प्रतिबंधक विभागाच्या प्रमुख डॉ. वैशाली जाधव यांनी ही माहिती दिली आहे.