सोसायटी आणि घरातील पाण्याच्या टाक्या आणि इमारतींच्या आजूबाजूला पडलेले भंगार सामान तुम्ही अजूनही स्वच्छ केले नसेल, तर वेळीच सावध व्हा! पालिकेच्या कीटक प्रतिबंधक विभागाने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणानुसार शहरात झाकण नसलेल्या पाण्याच्या टाक्या आणि भंगार वस्तूच डेंग्यूच्या डासांचे प्रमुख अधिवास ठरत आहेत. विशेष म्हणजे सहसा डेंग्यूसाठी ओळखल्या न जाणाऱ्या सहकारनगर आणि टिळक रस्त्यावरच हे अधिवास सर्वाधिक सापडले आहेत.
कीटक प्रतिबंधक विभागाने मे महिन्यात शहरातील डासोत्पत्ती स्थानांच्या सर्वेक्षणाला सुरुवात केली होती. या सर्वेक्षणाचा अहवाल मंगळवारी समोर आला. या अहवालानुसार शहरात तब्बल ७३ हजार ८९३ ठिकाणी डासांच्या वाढीसाठी पोषक जागा आढळल्या आहेत. यातील ४० हजार १३५ डासोत्पत्ती स्थाने कायम स्वरूपाची आहेत, तर ३३ हजार ७५८ डासोत्पत्ती स्थाने तात्पुरती म्हणजे पावसाळ्यात पाणी साठून तयार झाली आहेत. विभागाच्या प्रमुख डॉ. वैशाली जाधव यांनी ही माहिती दिली.
सर्वेक्षणाच्या अहवालानुसार पाण्याच्या टाक्या आणि टायर, पाणी ठिबकणारे फ्रिज, एअर कूलर, वातानुकूलित यंत्रणा आणि इतर भंगार सामान यात डासांची पैदास सर्वाधिक होत असल्याचे समोर आले आहे. शहरात पाण्याच्या २४ हजार ९०० टाक्यांमध्ये झाकणे नसल्यामुळे डासोत्पत्तीसाठी उत्तम वातावरण निर्माण झालेले आढळले. तर २३ हजार ६३० ठिकाणी इतस्तत: पडलेल्या भंगार सामानात पाणी साठून डासांसाठी पोषक वातावरण तयार झाल्याचे दिसले. भंगार सामान घरांच्या आजूबाजूला पडलेले आढळण्यात सहकारनगर आघाडीवर तर टिळक रस्ता द्वितीय क्रमांकावर आहे. हडपसरचा या यादीत तिसरा क्रमांक लागला आहे. पाण्याच्या उघडय़ा टाक्यांमध्ये कोंढवा वानवडी पहिल्या क्रमांकावर, तर हडपसर व सहकारनगर अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांकांवर आहेत.
डासांच्या कायमस्वरूपी उत्पत्ती स्थानांची आकडेवारी पाहता १२ हजार ६५० उत्पत्ती स्थानांसह हडपसर प्रथम क्रमांकावर आहे. पावसामुळे तयार झालेल्या तात्पुरत्या स्वरूपाच्या डासोत्पत्ती स्थानांमध्ये मात्र ५ हजार ७३३ टिळक रस्त्याचाच पहिला क्रमांक लागला आहे. भंगार आणि पाण्याच्या टाक्यांव्यतिरिक्त तळघरे, पाणी वाहून जाण्याची चेंबर, सेप्टिक टँक, कमळाची कुंडे, जलतरण तलाव, लिफ्टचे गाळे (डक्ट), हौद आणि खड्डय़ांमध्येही पाणी साठून डासांसाठी पोषक ठिकाणे तयार झाली असल्याचे या सर्वेक्षणात दिसून आले.
डेंग्यूच्या डासांची पैदास कशी टाळाल?
– घराच्या परिसरातील टाकाऊ वस्तूंची व भंगार सामानाची विल्हेवाट लावा.
– इमारतींवरील पाण्याच्या टाक्या, हौद, व घरातील पाण्याच्या भांडय़ावर घट्ट झाकणे बसवा.
– एअर कूलर, एसी, कुंडय़ा, फुलदाण्या अशा वस्तूंमध्ये पाणी साचू देऊ नका. या वस्तू आठवडय़ातून एकदा कोरडय़ा करा.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा