शहराच्या अनेक भागांमध्ये सार्वजनिक ठिकाणी साठून राहिलेल्या पाण्यामुळे डासच डास होत असून त्यामुळे नागरिक पुरते हैराण होऊन गेले आहेत. पालिकेच्या कीटक प्रतिबंधक विभागाने नागरिकांसाठी दिलेल्या हेल्पलाइन क्रमांकावर तकारींचा पाऊस पडत
असून गेल्या चारच दिवसांत ४५ नागरिकांनी आपल्या भागात डास असल्याच्या तक्रारी पालिकेकडे केल्या आहेत.
पडीक जागांमध्ये तसेच बस स्थानके, तळघरे व सब-वे अशा ठिकाणी साठून राहणारे पाणी, चालू बांधकामांमध्ये निष्काळजीपणे साठवून ठेवले जाणारे पाणी, रस्ता खुदाईच्या किंवा रस्तारुंदीसारख्या कामांमध्ये खोदलेल्या खाणींसारख्या खड्डय़ांमध्ये साठून राहणारे पाणी नागरिकांसाठी त्रासदायक ठरत असून या पाण्यामुळे परिसरात डासच डास होत असल्याची तक्रार नागरिक करत आहेत. कोथरूडमधील धोंडिबा सुतार बस स्थानकाच्या तळघरात अनेक दिवसांपासून पाणी साठून राहत असल्याचे काही सजग वाचकांनी ‘लोकसत्ता’ला कळवले आहे. या साठलेल्या पाण्यामुळे डास होत असून त्याकडे लक्ष दिले जात नसल्याचेही या वाचकांनी सांगितले. कर्वेनगर येथील काकडे प्लाझाच्या समोर सुरू असलेल्या खुदाई कामांत खोदलेल्या खड्डय़ांमध्ये पावसाचे हजारो लिटर पाणी साठून राहिले असल्याचे निरीक्षणही एका वाचकांनी नोंदवले.
आपल्या भागात डासांची तक्रार असल्यास पालिकेने नागरिकांसाठी ०२०-२५५०८४७४ हा हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. आरोग्य विभागाने पुरवलेल्या माहितीनुसार नोंव्हेंबरमध्ये चारच दिवसांत या क्रमांकावर ४५ नागरिकांनी डासांबाबतच्या तक्रारी नोंदवल्या आहेत. तर आतापर्यंत या क्रमांकावर आलेल्या एकूण तक्रारींची संख्या ७९५ आहे.