लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : पुणे शहर काँग्रेसमध्ये रविवारी झालेल्या इच्छुकांच्या मुलाखतींत सर्वाधिक पसंती पुणे कँटोन्मेंट आणि शिवाजीनगर या दोन मतदारसंघांना मिळाल्याचे स्पष्ट झाले. महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढताना काँग्रेसच्या वाट्याला हे दोन आणि कसबा मतदारसंघ येतील, अशी शक्यता असल्यानेच हे चित्र दिसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. पण, या तीन मतदारसंघांव्यतिरिक्त इतरही मतदारसंघ काँग्रेसकडे खेचून आणण्यासाठी तेथील इच्छुक प्रयत्नशील असल्याचे स्पष्ट झाले.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री आणि पुणे लोकसभेच्या प्रभारी यशोमती ठाकूर आणि जगदीश ठाकूर यांनी रविवारी काँग्रेस भवन येथे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. शहर काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे, पुणे लोकसभा समन्वयक अजित दरेकर या वेळी उपस्थित होते. पुण्यातील आठ विधानसभा मतदारसंघांतून ४१ जणांनी निवडणूक लढविण्याची तयारी दर्शविली.

आणखी वाचा-पुणे : प्रभात रस्त्यावर इमारतीत आग; ज्येष्ठ महिलेसह सात जणांची सुटका

काँग्रेस महाविकास आघाडीतील घटक पक्ष म्हणून निवडणूक लढविणार आहे. महाविकास आघाडीचे जागावाटप अंतिम टप्प्यात आले आहे. जागावाटपानंतरच काँग्रेसच्या वाट्याला शहरातील किती मतदारसंघ येणार, हे स्पष्ट होणार आहे. कसबा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे रवींद्र धंगेकर विद्यमान आमदार आहेत. मात्र, या मतदारसंघातून माजी महापौर कमल व्यवहारे, संगीता तिवारी, मुक्तार शेख आणि बाळासाहेब दाभेकर हेही निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत.

शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात उमेदवारीसाठी जोरदार रस्सीखेच होणार आहे. माजी नगरसेवक दत्ता बहिरट, माजी आमदार दीप्ती चवधरी, मनीष आनंद आणि सध्या भाजपमध्ये असलेले सनी निम्हण यांच्यासह ११ इच्छुक उमेदवार आहेत. विशेष म्हणजे सनी निम्हण यांच्या पक्ष प्रवेशाला आणि त्यांना उमेदवारी देण्यास काँग्रेसचा विरोध असताना आणि तसा ठराव एकमताने केला असतानाही निम्हण यांची इच्छुक म्हणून मुलाखत घेण्यात आली. या वेळी निम्हण समर्थकांनीही जोरदार शक्तिप्रदर्शनही केले.

आणखी वाचा-हर्षवर्धन पाटील यांच्याकडे इंदापूर काँग्रेस भवनाचा ताबा?

पुणे कँटोन्मेंट मतदारसंघात काँग्रेसची मोठी ताकद आहे. त्यामुळे या मतदारसंघातील इच्छुकांची संख्याही मोठी आहे. माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, माजी नगरसेवक अविनाश बागवे, शिवसेना (ठाकरे) पक्षातून काँग्रेसमध्ये आलेले ॲड. अविनाश साळवे, माजी नगरसेविका लता राजगुरू, मिलिंद अहिरे यांच्यासह एकूण दहा उमेदवारांनी या मतदारसंघासाठी मुलाखती दिल्या.

पर्वती मतदारसंघात माजी उपमहापौर आबा बागुल यांच्यासह तिघे, तर हडपसरमधून माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवकर यांच्यासह दोन जण इच्छुक आहेत. खडकवासल्यातून श्रीरंग चव्हाण यांच्यासह अन्य दोघांना उमेदवारी हवी आहे. कोथरूडमधून संदीप मोकाटे यांनी उमेदवारी मागितली आहे. वडगाव शेरीतूनही पाच उमेदवार इच्छुक आहेत.

आणखी वाचा-Baba Siddique Shot Dead : सिद्दीकींच्या हत्येच्या कटाचे धागेदोरे पुण्यापर्यंत! हत्येपूर्वी एकाकडून समाज माध्यमात मजकूर प्रसारित

मुलाखत प्रक्रियेत प्रमुख पदाधिकाऱ्यांना डावलले?

माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीत झालेल्या या मुलाखतीवेळी राज्य पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले नव्हते. त्याबाबत काही पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी असल्याने मुलाखत प्रक्रियेत सहभागी करून घ्यावी, अशी पदाधिकाऱ्यांची अपेक्षा होती. प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेत मोठा सहभाग असतानाही डावलले गेल्याने पदाधिकारी नाराज असल्याचे सूत्रांनी सांगितले.