राज्यातील धक्कादायक बाब उघड; ठाण्याचा क्रमांक दुसरा
सांस्कृतिक शहर म्हणून ओळख असलेल्या पुण्यात मोबाइल आधारित व्यसनांमुळे सर्वाधिक गुन्हे घडले असून, या बाबतीत ठाणे दुसऱ्या क्रमांकावर आहे. मोबाइल व्यसनांतून हत्या, आत्महत्या, अपघात असे या गुन्ह्य़ांचे स्वरूप आहे.
आनंदवन व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्रातर्फे राज्य शासनाकडे माहिती अधिकारामध्ये याबाबत माहिती मागवण्यात आली होती. शासनाकडून मिळालेल्या तपशिलांमधून हे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
व्यसनमुक्ती क्षेत्रात गेली अनेक वर्षे काम करणाऱ्या आणि महाराष्ट्रातील पहिले इंटरनेट व्यसनमुक्ती केंद्र असलेल्या आनंदवन व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्राच्या मनोविकास-मानसोपचार आणि ध्यान केंद्रातर्फे राज्य शासनाकडून माहिती अधिकारात मागवलेल्या माहितीतून वस्तुस्थितीवर प्रकाश पडला आहे.
केंद्राचे समुपदेशक हर्षल पंडित यांनी माहिती अधिकारामध्ये शासनाकडे अर्ज केला होता. पुण्यासह कोल्हापूर, अमरावती, औरंगाबाद, भंडारा, चंद्रपूर, लातूर, नागपूर, नाशिक, पालघर, रायगड, रत्नागिरी, सातारा, वर्धा, यवतमाळ, बुलढाणा, जळगाव आणि मुंबईमधील गुन्ह्यांची संख्या शेकडय़ांमध्ये आहे, तर सर्वात कमी गुन्ह्य़ांची नोंद हिंगोलीमध्ये झाली आहे.
अनेक शहरांची माहिती मिळण्याची प्रक्रिया अजून सुरू आहे, अशी माहिती आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राचे अध्यक्ष डॉ. अजय दुधाणे यांनी दिली.
काय झाले ? महाराष्ट्रामध्ये २०१४ ते २०१८ या चार वर्षांमध्ये मोबाइल आणि इंटरनेटमुळे किती आत्महत्या झाल्या, किती लोकांवर गुन्हे दाखल झाले तसेच या कालावधीमध्ये इंटरनेट आणि मोबाइलच्या माध्यमातून झालेल्या गैरसमजातून किती जणांचे खून झाले, किती जणांचे अपघात झाले, याचे तपशील समोर आले आहेत.
धक्कादायक..
मोबाइल आणि इंटरनेटमुळे ३८ शहरे आणि ग्रामीण भागांतून २० हजार २७४ गुन्हे झाले आहेत. प्रत्येक शहरातील सायबर सेलकडून ही माहिती केंद्राला मिळाली आहे. त्यामध्ये पुण्यात सर्वाधिक गुन्हे नोंद आहे. या संदर्भातील १३ हजार ३५७ पैकी १२ हजार ६८३ खटले सोडविण्यात आले असून ६७४ खटले सोडविणे बाकी आहेत. पुण्यापाठोपाठ ठाण्यामध्ये एक हजार १९ गुन्ह्य़ांची नोंद झाली आहे.
शालेय जीवनापासूनच मुलांच्या हातामध्ये मोबाइल आले आहेत. इंटरनेटच्या अतिवापरामुळे गुन्ह्य़ांचे प्रमाण वाढत आहे. इंटरनेट आणि मोबाइलमुळे घडलेल्या गुन्ह्य़ांमध्ये तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या गुन्हेगारांचे समुपदेशन योग्य वेळी झाल्यास ते भविष्यात यापासून परावृत्त होऊ शकतील. त्यासाठी आनंदवन व्यसनमुक्ती केंद्र मनोविकास प्रकल्पाच्या माध्यमातून काम करण्यास तयार आहे.
-डॉ. अजय दुधाणे, अध्यक्ष, आनंदवन व्यसनमुक्ती केंद्र