पुणे : उच्च शिक्षणासाठी भारतीय विद्यार्थ्यांकडून आता आयर्लंडला पसंती दिली जात आहे. आयर्लंडमधील भारतीय विद्यार्थ्यांची संख्या आता दहा हजारांच्या घरात गेली असून, त्यातील बहुतांश विद्यार्थी पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाचे आहेत. ‘एज्युकेशन इन आयर्लंड’च्या भारत आणि दक्षिण आशियाचे प्रादेशिक व्यवस्थापक बॅरी ओड्रिस्कोल यांनी ही माहिती दिली. एज्युकेशन इन आयर्लंडतर्फे पुण्यात हॉटेल शेरेटन ग्रँड येथे आयर्लंडमधील विविध विद्यापीठे, त्यात उपलब्ध असणारे अभ्यासक्रम, व्हिसा प्रक्रिया, शिष्यवृत्ती या बाबतची माहिती देण्यात आली. पुण्यासह देशभरातील अन्य चार शहरांमध्येही असे कार्यक्रम होणार आहेत. अमेरिका, इंग्लंड, कॅनडा, चीन, जपान, ऑस्ट्रेलिया अशा काही देशांमध्ये भारतीय विद्यार्थी मोठ्या संख्येने शिक्षणासाठी जातात. त्यात आता आयर्लंडचेही स्थान उंचावत असल्याचे दिसून येत आहे.
ओड्रिस्कोल म्हणाले, ‘जगभरातून ६० हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी आयर्लंडला येतात. त्यातील भारतीय विद्यार्थ्यांची संख्या दहा हजारांच्या घरात पोहोचली आहे. आतापर्यंत पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी आयर्लंडला पसंती दिली जात होती. मात्र, आता पदवी अभ्यासक्रमांचे प्रवेशही वाढत आहेत. गेल्या काही वर्षांत भारतीय विद्यार्थ्यांचा टक्का वाढू लागला आहे. अभियांत्रिकी, व्यवस्थापन, विज्ञान अशा विद्याशाखांतील पदवी-पदव्युत्तर अभ्यासक्रम विद्यापीठांमध्ये उपलब्ध आहेत. उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ अध्यापनासाठी विद्यापीठांमध्ये येतात. विद्यार्थ्यांना शिकतानाच काम करण्याचीही संधी मिळते. पदवीनंतर एक वर्ष आणि पदव्युत्तरनंतर दोन वर्षांचा व्हिसा वाढवून मिळतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणानंतर नोकरीही करता येते.’
हेही वाचा : घटस्थापनेसाठी दुपारी पावणेदोनपर्यंत मुहूर्त, तृतीयेची वृद्धी झाल्याने नवरात्र दहा दिवसांचे
‘शिक्षणासाठी आयर्लंडमधील विद्यापीठांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या शिष्यवृत्त्यांचे पर्याय मिळतात. त्यात आयर्लंड सरकारची शिष्यवृत्ती, विद्यापीठांची शिष्यवृत्ती, विद्यावेतनाचा समावेश आहे. त्याशिवाय गुणवत्तेनुसार शुल्कात कपातही केली जाते. विद्यार्थ्यांना शिकतानाच काम करण्याचीही मुभा असते. त्यामुळे सरासरी किमान २३ युरो प्रति तास या दराने वेतनही मिळते,’ अशी माहिती विद्यापीठांच्या अधिकाऱ्यांनी दिली.
हेही वाचा : हडपसर भागात टोळक्याकडून वाहनाची तोडफोड, शहरात दहशत माजविण्याचे सत्र कायम
‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात भारत सरकारने आता परदेशी विद्यापीठांना भारतात शैक्षणिक केंद्र स्थापन करण्याची परवानगी दिली आहे. त्या अनुषंगाने आयर्लंडकडून या धोरणाचा अभ्यास सुरू आहे. काही विद्यापीठे भारतात येऊ शकतात. मात्र अद्याप याबाबत काहीच निर्णय झालेला नाही. आयर्लंडमधील विद्यापीठांचे भारतातील विद्यापीठांशी करार आहेत. त्या अंतर्गत प्राध्यापक देवाण-घेवाण केली जाते,’ असे ओड्रिस्कोल यांनी सांगितले.