पुढील वर्षांच्या अखेरीस शिवाजीनगर ते पिंपरीपर्यंत मेट्रोची प्रवासी वाहतूक सुरू करण्याचा मानस

पिंपरी : पिंपरी-चिंचवडमध्ये महामेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे काम प्रगतिथावर आहे. मेट्रोच्या बहुतांश खांबांचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर असून पवना नदीमधील पाच खांबांच्या उभारणीस सुरुवात करण्यात आली आहे. पुढील वर्षांच्या अखेरीस शिवाजीनगर ते पिंपरीपर्यंत मेट्रोची प्रवासी वाहतूक सुरू करण्याचा मानस असल्याचे महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

पुणे महामेट्रोच्या पहिल्या टप्प्यात स्वारगेट ते पिंपरी या मार्गावरील दापोडी ते पिंपरी दरम्यान मेट्रोच्या कामाचा प्रारंभ पिंपरीतून करण्यात आला. पहिल्या खांबाचे काम संत तुकारामनगर येथे पूर्ण करण्यात आले. मेट्रोच्या कामासाठी पिंपरीमध्ये जागा ताब्यात असल्यामुळे मेट्रो प्रशासनाला कामाची गती राखता आली आहे. मेट्रोच्या मार्गात येणाऱ्या वृक्षांची तोडणी केल्यानंतर त्याचे पुनरेपणही करण्यात आले. पिंपरीमध्ये चारशे छपन्न खांबांपैकी एकशे त्र्याऐंशी खांबाचे काम पूर्ण झाले आहे. तर तीनशे चोवीस खांबांचा पाया पूर्ण झाला आहे. तसेच रूळ टाकण्यासाठी लागणारे ‘पिलर कॅप’ एकशे चार बसविण्यात आले आहेत. तर एक हजार अडोतीस कॅप तयार करून ठेवण्यात आले आहेत.

संत तुकारामनगर येथील मेट्रो स्थानकाचे काम प्रगतिपथावर असून स्थानक उभारण्यासाठी आठ खांब उभारणीचे काम पूर्ण झाले आहे. कासारवाडी आणि फुगेवाडी येथील स्थानकाच्या कामासाठी पायाभरणीचे काम सुरू आहे. दापोडी येथील सीएमईपासून मेट्रो रेल्वेला नदी पार करावी लागेल. त्यामुळे नदीतील पाच खांबांच्या उभारणीचे काम सुरू करण्यात आले आहे. सीएमई जवळ पुणे-मुंबई महामार्गावर बोगद्याचे काम झाल्यानंतर नदीच्या कडेने खांबाचे काम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती महामेट्रोचे जनसंपर्क  अधिकारी हेमंत सोनवणे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.

Story img Loader