पुणे : सदोष रस्ते बांधणी आणि दुरुस्तीमुळे पावसाळी गटारे निरूपयोगी ठरत असल्याची वस्तुस्थिती शहरात सुरू झालेल्या पावसामुळे पुढे आली आहे. चुकीच्या पद्धतीने रस्त्यांची दुरुस्ती केल्याने बहुतांश रस्त्यांवर पाणी साचत असून पावसाळी गटारांच्या दुरुस्तीसाठी केलेल्या कोट्यवधी रुपयांचा खर्चही पाण्यात गेल्याचे दोन दिवसांच्या पावसमुळे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे महापालिकेच्या रस्ते दुरुस्तीच्या कामावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पावसाळ्याच्या कालावधीत रस्त्यांवर पाणी साठू नये, यासाठी गेल्या काही वर्षात महापालिकेने अनेक रस्त्यांवर शेकडो कोटी रुपयांचा खर्च करून पावसाळी गटारांची निर्मिती केली आहे. पावसाळी गटारांमुळे पाण्याचा योग्य प्रकारे निचरा होईल, असा दावाही महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला होता. महापालिकेच्या पथ विभागाकडून गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यापासून विविध सेवा वाहिन्या टाकण्यासाठी आणि अत्यावश्यक कामे करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रस्ते खोदाई करण्यात आली. रस्ते खोदाई केल्यानंतर रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले.
हेही वाचा >>> राज्यसेवा परीक्षेबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय, वैद्यकीय पात्रतेच्या आधारे…
रस्त्यांचे डांबरीकरण करताना किंवा रस्त्यांची दुरुस्ती करताना त्यांचा उतार पावसाळी गटारांच्या चेंबर किंवा मॅनहोलकडे राहील, याची कोणतीही दक्षता कंत्राटदाराकडून न घेण्यात आल्यामुळे मॅनहोल किंवा चेंबर भोवती पाणी साचून रहात असल्याचे चित्र शहरातील बहुतांश रस्त्यांवर दिसून येत आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांच्या थोड्या पावसाने रस्त्यावर तळी साचली असून पावसाचा जोर वाढल्यानंतर त्याचा फटका पादचारी, वाहनचालकांना बसणार आहे. गेल्या दोन दिवसांत झालेल्या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले असून पावसाचे पाणी वाहून नेणारी पावसाळी गटारे कुठे आहेत, असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. सदोष पद्धतीने रस्त्यांची बांधणी आणि दुरुस्ती केल्यामुळे पावसाळी गटारे निरुपयोगी ठरत असून त्यामुळे नागरिकांच्या कराचे शेकडो कोटी रुपये पाण्यात गेल्याचेही चित्र आहे.
दरम्यान, यासंदर्भात सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी महापालिका आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार आणि पथ विभागाकडे तक्रार नोंदविली आहे. रस्ते दुरुस्तीची कामे योग्य आणि शास्त्रीय पद्धतीने कंत्राटदारांकडून होतात की नाही, हे तपासण्याची जबाबदारी महापालिकेच्या अधिकाऱ्यांची आहे. मात्र अधिकारी केवळ कंत्राटदारांची देयके काढण्याचे काम करतात. त्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे, असे वेलणकर यांनी या तक्रारीत नमूद केले आहे. रस्त्यावर पाणी साचण्याच्या ठिकाणांचे तातडीने सर्वेक्षण करावे आणि ज्या रस्त्यावर पावसाळी गटारे बांधली आहेत, मात्र तेथे पाणी साचत असल्यास संबंधित कंत्राटदार आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही वेलणकर यांनी केली आहे.