लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीत शहरासह जिल्ह्यात भाजपला सर्वाधिक ९, तर राष्ट्रवादीला ८ जागा मिळतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मात्र ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळण्याचा अंदाज असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यात वर्चस्व राहण्याची शक्यता न्यूज एरेना इंडिया या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात नोंदविण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला इंदापूर विधानसभा मतदारसंघाची जागा, तर भारतीय जनता पक्षाला पुणे कॅन्टोन्मेंट आणि शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाची जागा गमवावी लागेल, असा अंदाजही सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील तिन्ही मतदारसंघांत उलथापालथ होण्याची शक्यता नाही.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला १२५ जागा मिळतील, असा अंदाज न्यू एरेना इंडिया या संस्थेने वर्तविला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील मतदारसंघात काय परिस्थिती राहील, याचा अंदाजही वर्तविण्यात आला आहे. भाजपकडून काँग्रेसने खेचून घेतलेला कसबा विधनसभा मतदारसंघ भाजप पुन्हा राखेल, अशी शक्यताही वर्तविण्यात आली आहे. पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे, विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा जिल्ह्यात दबदबा आहे. मात्र शहरासह जिल्ह्यात भाजपला सर्वाधिक नऊ जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेसला आठ जागा मिळतील, असे सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे.

आणखी वाचा-पिंपरी महापालिका करणार बचत गटांच्या सक्षमीकरणासाठी आठ कोटी खर्च

ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसच सवाधिक जागा जिंकणारा पक्ष असेल, असे न्यूज एरेना इंडिया या संस्थेच्या सर्वेक्षणात स्पष्ट करण्यात आले आहे. जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, बारामती आणि मावळ या जागा राष्ट्रवादी कायम राखणार असल्याचे दाखविण्यात आलेले आहे. मात्र, बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर हा विधानसभा मतदारसंघ भाजपकडे जाण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. दुसरीकडे मावळमध्ये भाजपला पुन्हा धक्का बसेल, असा अंदाजही नोंदविण्यात आला आहे.

ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेस सहा जागा जिंकणार असला, तरी भाजपला दौंड आणि इंदापूर मिळतील. पिंपरीची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे कायम राहील, तर चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघांत भाजपला यश मिळेल, असाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. शहरातील कसबा, वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ भाजपकडे जातील तर शिवाजीनगर आणि पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ भाजपला गमवावे लागण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. हडपसर मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहण्याची शक्यता आहे.

Story img Loader