पुणे : सार्वजनिक आरोग्य विभागाकडून निरोगी तरुणाई, वैभव महाराष्ट्राचे ही मोहीम राबविली जात आहे. त्यामध्ये राज्यात उच्च रक्तदाबाचे सर्वाधिक पुरूष रुग्ण पुणे जिल्ह्यात आढळून आले आहेत. त्याखालोखाल नाशिक आणि ठाणे जिल्ह्याचा क्रमांक आहे. याचवेळी मधुमेहाचे रुग्णही पुण्यात सर्वाधिक नोंदविण्यात आले आहेत.
निरोगी तरुणाई, वैभव महाराष्ट्राचे ही मोहीम मागील वर्षी १७ सप्टेंबरपासून सुरू झाली. या मोहिमेत राज्यातील १८ वर्षांवरील पुरुषांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. आतापर्यंत २ कोटी ७९ लाख ९९ हजार २९० पुरुषांची तपासणी पूर्ण करण्यात आली. त्यातील २ कोटी ६८ लाख ९७ हजार ३७४ जणांच्या आरोग्य तपासणीसोबत ईसीजी, सिटी स्कॅन आणि एक्स रे आदी चाचण्या करण्यात आल्या आहेत. याचबरोबर ३४ लाख ८९ हजार २२२ जणांवर औषधोपचार करण्यात आला असून, २९ हजार ६५५ जणांवर लहान-मोठ्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत, अशी माहिती आरोग्य सहसंचालक डॉ. विजय कंदेवाड यांनी दिली.
या तपासणी मोहिमेत राज्यात ३८ लाख ७ हजार ३५६ जणांना उच्च रक्तदाब असल्याची धक्कादायक बाब समोर आली. त्यातील सर्वाधिक ५ लाख ७१ हजार १७९ जण पुणे जिल्ह्यातील आहेत. त्यानंतर नाशिकमध्ये २ लाख ७२ हजार ३५१ आणि ठाण्यात २ लाख २८ हजार ४१९ रुग्ण उच्च रक्तदाबाचे आढळले आहेत. या मोहिमेत निश्चित केलेल्या उद्दिष्टांपैकी पुण्यात ८५ टक्के रुग्णांची तपासणी पूर्ण झाली आहे. नाशिकमध्ये ८६ टक्के तर साताऱ्यात ७६ टक्के रुग्णांची तपासणी झाली आहे. इतर जिल्ह्यांपेक्षा तपासणीचे प्रमाण जास्त असल्याने या जिल्ह्यांमध्ये रुग्ण जास्त आढळून आले आहेत, असे आरोग्य विभागातील सूत्रांनी सांगितले.
राज्यात मधुमेहाचे ४ लाख ६७ हजार रुग्ण आढळले असून, त्यात सर्वाधिक ३७ हजार रुग्ण पुण्यातील आहेत. त्याखालोखाल कोल्हापूरमध्ये ३६ हजार आणि अकोल्यात २६ हजार मधुमेहाचे रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात हृदयविकाराचे १ लाख ८६ हजार रुग्ण आढळले आहेत. मुखाच्या कर्करोगाचे ७४ रुग्ण आढळले असून, ओरल सबम्युकस फायब्रोसिसचे १ हजार ६६८ रुग्ण आढळले आहे. मोतिबिंदूचे ७७८ आणि रक्तक्षयाचे १ हजार २९८ रुग्ण आढळले आहेत, असे सूत्रांनी नमूद केले.
मागील ५ ते १० वर्षांत उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचे रुग्ण पंचविशीच्या आतमध्ये आढळून येऊ लागले आहेत. आपल्या आहाराच्या सवयी बदलल्या असून, बैठी जीवनशैली सगळीकडे दिसते. यामुळे वजन वाढून उच्च रक्तदाबासह मधुमेहाचे विकार वाढत आहेत.
-डॉ.अविनाश भोंडवे, आरोग्यतज्ज्ञ
जीवनशैलीत झालेल्या बदलामुळे उच्च रक्तदाबाचे रुग्ण वाढल्याचे दिसून येत आहे. फास्ट फूड खाण्यामुळे आरोग्य विषयक अनेक तक्रारी निर्माण होत आहेत. त्यातच व्यायामाचे प्रमाण कमी झाल्याने त्यात आणखी भर पडत आहे.
-डॉ. नागनाथ येमपल्ले, जिल्हा शल्यचिकित्सक, पुणे
उच्च रक्तदाब, मधुमेहाची कारणे
१. अनुवांशिकता
भारतीयांमध्ये उच्च रक्तदाब आणि मधुमेह हे विकार अनुवांशिकरीत्या मोठ्या प्रमाणात आढळून येतात.
२. बदलती जीवनशैली
बदलत्या जीवनशैलीमुळे शारीरिक हालचाल मंदावली असून, कामाची पद्धतीही आधुनिकतेनुसार बैठी बनली आहे.
हेही वाचा : समुपदेशन: नात्यातलं ‘आइस ब्रेकिंग’!
३. बदलता आहार
भारतीयांच्या आहारात गोड, पिष्टमय पदार्थांचे प्रमाण अधिक असून, प्रथिनयुक्त पदार्थ कमी आहेत. याचबरोबर जंक फूड आणि फास्ट फूडचे प्रमाणही वाढले आहे.