प्रारूप यादीबाबत ३१ ऑक्टोबपर्यंत हरकती देता येणार

पुणे शहर आणि जिल्हय़ाची प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली असून, पुणे शहरातील आठ, पिंपरी-चिंचवडमधील तीन आणि जिल्हय़ातील दहा अशा २१ विधानसभा मतदार संघांमधील मिळून मतदारांची संख्या ७१ लाख ८९ हजार २६५ झाली आहे. प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदारयादीबाबत नागरिकांना ३१ ऑक्टोबपर्यंत हरकती नोंदवता येणार आहेत.

जिल्हा प्रशासनाने नुकतीच प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध केली. यापूर्वीच्या मतदारयादीत ७२ लाख २३ हजार ४२२ मतदार होते. प्रारूप यादीतून ५४ हजार ५८४ मतदार वगळण्यात आले आहेत. तर, नव्याने २० हजार २६४ मतदारांचा समावेश झाला आहे. परिणामी, ३४ हजार १५७ मतदार कमी झाले आहेत. शहर आणि जिल्हय़ाचा विचार करता चिंचवड विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक चार लाख ६७ हजार मतदार आहेत, तर आंबेगाव विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी दोन लाख ७१ हजार ६९९ मतदार आहेत.

पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये खडकवासला मतदारसंघात सर्वाधिक चार लाख ५१ हजार ८९५ मतदार असून, पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी २ लाख ७७ हजार ६१७ मतदार आहेत. जिल्हय़ातील दहा मतदारसंघांपैकी शिरूरमध्ये तीन लाख ४२ हजार ९६५ असे सर्वाधिक मतदार आहेत.

दरम्यान, प्रारूप मतदारयादी ‘डब्लूडब्लूडब्लू डॉट सीइओ डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन’ या संकेतस्थळासह मतदान केंद्र अधिकारी, तहसीलदार कार्यालयांत पाहण्यासाठी उपलब्ध  आहे. हरकती ३१ ऑक्टोबपर्यंत स्वीकारल्या जाणार आहेत.

३० ते ३९वयोगट -१८ लाख ६० हजार ९१० मतदार

शहर आणि जिल्ह्य़ात मिळून ३० ते ३९ या वयोगटातील १८ लाख ६० हजार ९१० मतदार आहेत. तर, १८ ते १९ या वयोगटातील मतदारांची संख्या ९८ हजार १४१ झाली आहे. शहरासह जिल्हय़ात ३७ लाख ६६ हजार ३३३ पुरुष मतदार असून ३४ लाख २२ हजार ८१५ महिला मतदार आहेत. कसबा मतदारसंघात पुरुष मतदार एक लाख ४० हजार २०६, तर महिला मतदार एक लाख ४२ हजार ३३२ आहेत. महिला मतदारांची संख्या वाढली असून उत्साह दिसून आला आहे.

Story img Loader