कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार देण्यासाठी मुलीबरोबर आलेल्या सासूवर जावयाने चाकूने वार केल्याची घटना हडपसर पोलीस ठाण्याच्या आवारात घडली. पोलीस ठाण्याच्या आवारात एका पोलीस उपनिरीक्षकाने हा प्रकार पाहिल्यानंतर त्याने प्रसंगावधान राखून जावयाला पकडले. त्यामुळे अनर्थ टळला. जखमी झालेल्या सासूला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हेही वाचा – भयावह : पुण्यात पती-पत्नीची हत्या करून रक्ताने माखलेली टिकाव हाती घेत आरोपी निघाला रस्त्याने…

हेही वाचा – “उशीरा का होईना महाराष्ट्राला न्याय मिळाला”, राज्यपालांच्या राजीनाम्यावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या, “कोणत्याही देशात..”

पुष्पा दामोदर पालवे (वय ४६, रा. महादेवनगर, मांजरी) असे जखमी झालेल्या सासूचे नाव आहे. या प्रकरणी जावई मंगेश महादा तारे (वय २९, रा. वडगाव शेरी) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत सासरे दामोदर यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वडगाव शेरीत मंगेश आणि त्याची पत्नी पूजा राहायला आहेत. मंगेश पत्नीला त्रास देत होता. त्यामुळे पूजा माहेरी निघून आली होती. पूजा आणि तिची आई पुष्पा शनिवारी (११ फेब्रुवारी) सायंकाळी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आल्या होत्या. त्या वेळी मंगेश तेथे आला. आमच्यात वाद नसल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. सासू पुष्पा यांना धरले आणि पाया पडण्याचा बहाणा केला. मंगेशने जर्किनमध्ये चाकू लपविला होता. त्याने सासू पुष्पा यांच्यावर चाकूने हल्ला केला. त्या वेळी पोलीस उपनिरीक्षक संतोष गोरे तेथे होते. गोरे यांनी प्रसंगावधान राखून मंगेशला रोखले. त्याच्या हातातील चाकू उपनिरीक्षक गोरे यांनी ताब्यात घेतला. रात्री उशीरा त्याला अटक करण्यात आली.