सतत आजारी पडणाऱ्या तीन महिन्यांच्या नातीचा आजीने पाण्याच्या बॅरलमध्ये बुडवून खून केल्याची धक्कादायक घटना कोंढवा परिसरात मंगळवारी (३ एप्रिल) घडली. तीन महिन्यांच्या नातीला पळवून नेल्याचा बनाव रचणाऱ्या आजीचे बिंग पोलिसांनी चौकशीत फोडले. या प्रकरणी आजीला अटक केली आहे.
सुशीला संजय तारु (वय ५०, रा. अतुरनगर सोसायटी, कोंढवा) असे अटक करण्यात आलेल्या आजीचे नाव आहे. सहायक पोलीस निरीक्षक किरण पावसे यांनी या संदर्भात कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुशीला, त्यांचे पती संजय, मुलगा राजीव आणि सून मोनिका हे खडकवासला परिसरात राहायाला होते. चार महिन्यांपूर्वी ते कोंढव्यातील अतुरनगर सोसायटीत राहायाला आले. राजीव हे जमीन मोजणीचे कामे करतात. तीन महिन्यांपूर्वी त्यांची सून मोनिका ही प्रसूत झाली. मोनिकाच्या तीन महिन्यांच्या मुलीचा बेंबीत संसर्ग झाला होता. त्यामुळे ती सतत आजारी पडत होती. तिच्या बेंबीतून रक्तस्राव होत असल्याने तिच्यावर उपचार सुरू होते. उपचारासाठी सतत खर्च येत असल्याने आजी सुशीला नेहमी घरात वाद घालत होत्या. काही दिवसांपूर्वी तिला हडपसर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. तीन महिन्यांच्या बालिकेच्या मेंदूला सूज आली होती .तसेच पाय अधू झाला होता. तिच्यावर उपचार केले होते. मंगळवारी (३ एप्रिल) राजीव अंघोळीला गेले होते. तर मोनिका दुसरीकडे गेल्या होत्या. सुशीला हिने तीन महिन्यांच्या नातीला शयनगृहातील प्रसाधनगृहात नेले. तेथील पाण्याच्या बॅरलमध्ये तिला बुडविले. काही वेळानंतर मोनिका हिने मुलगी कुठे आहे, अशी विचारणा केली. तेव्हा त्या घरात शिरलेल्या दोन महिलांनी माझ्या हातातून मुलीला हिसकावून नेले, अशी बतावणी केली. राजीव व मोनिका यांनी मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली. पोलिसांनी या घटनेची माहिती दिली. सुशीला यांनी दिलेल्या जबाबानुसार पोलिसांनी शोध घेण्यास सुरुवात केली. जबाबात विसंगती आढळून आल्याने सुशीला यांची चौकशी करण्यात आली. पोलिसी खाक्या दाखविताच सुशीला यांनी नातीला बॅरलमधील पाण्यात बुडवून मारल्याची कबुली दिली. पोलिसांनी बॅरलमधून मृतदेह बाहेर काढला. सुशीला हिला अटक करण्यात आली असून सहायक पोलीस निरीक्षक विशाल वळवी तपास करत आहेत.

Story img Loader