पतीपासून विभक्त झाल्याने दोन मुले सांभाळणे शक्य होत नसल्याने पुण्यात एका आईने आपल्या ४ वर्षाच्या मुलाला १ लाख रुपयांना विकले. याबाबतची माहिती कोणाला समजू नये म्हणून आईने मुलाचे अपहरण (Kidnapping) झाल्याचा बनाव केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी आईसह एकूण ८ जणांना ताब्यात घेतले आहे. तसेच ४ वर्षाच्या मुलाला सुखरूप त्याच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले, अशी माहिती पोलीस उपायुक्त पोर्णिमा गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या प्रकरणातील आरोपी आईचे नाव प्रियांका गणेश पवार असे आहे. याशिवाय जन्नत बशीर शेख, रेश्मा सुतार, तुकाराम निंबळे, चंद्रकला माळी, भानुदास माळी, दीपक तुकाराम म्हात्रे आणि सीताबाई दीपक म्हात्रे अशी इतर अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

आईकडून आधी ४ वर्षाच्या मुलाच्या अपहरणाची तक्रार

पोलीस उपायुक्त पोर्णिमा गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार आई प्रियांका गणेश पवार यांनी ४ फेब्रुवारी कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये चार वर्षाच्या मुलाचे अपहरण झाले आहे अशी तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला. तपासात बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, दुपारी बांगड्यावाल्या भाभीच्या तिथे लहान मुलगा दिसला होता.

सीसीटीव्हीच्या माध्यमातून अपहरणाचा बनाव उघड

दरम्यान सीसीटीव्हीमध्ये एक महिला ४ वर्षाच्या मुलाला घेऊन जात असल्याचं आणि पुढे दुसर्‍या व्यक्तीकडे सोपवत असल्याचं दिसलं. यानंतर संबंधित महिलेची कसून चौकशी करण्यात आली. त्यानंतर आरोपी प्रियांका गणेश पवार हिने ४ वर्षाच्या मुलाला चंद्रकांत निंबळे याच्या मदतीने आरोपी चंद्रकला माळी आणि भानुदास माळी यांना १ लाख रुपयांना विकल्याचं कबुल केलं.

दुसऱ्यांदा १ लाख ६० हजार रुपयांना मुलाची विक्री

चंद्रकला आणि भानुदास माळी यांनी आरोपी दीपक म्हात्रे आणि सीताबाई म्हात्रे यांना दुसऱ्यांदा १ लाख ६० हजार रुपयांना मुलाची विक्री केल्याचं तपासात निष्पन्न झालं. यानंतर आरोपी आई प्रियांका गणेश पवार, जन्नत बशीर शेख, रेश्मा सुतार, तुकाराम निंबळे, चंद्रकला माळी, भानुदास माळी, दीपक तुकाराम म्हात्रे आणि सीताबाई दीपक म्हात्रे यांना अटक करण्यात आली. त्या सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता ९ फेब्रुवारीपर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

हेही वाचा : पिंपरी चिंचवडमध्ये ३०० कोटींच्या क्रिप्टो करन्सीसाठी पोलिसानेच केले अपहरण, ८ जणांना अटक

आरोपी आई प्रियांका पवार हिच्याकडे चौकशी केली असता ती म्हणाली, “पतीपासून विभक्त झाले असून २ मुले असल्याने त्यांचा सांभाळ करणे शक्य नव्हते. त्यामुळे चार वर्षाच्या मुलाला विकण्याचा निर्णय घेतला.” दोन व्यक्तींकडे विक्री झाली असल्याने आरोपी नेमके काय करणार होते याबाबत अधिक तपास सुरू आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mother sale her own 4 year child for 1 lakh rupees amid financial crisis in pune pbs
Show comments