लोणची, मसाले आणि ‘रेडी टू कुक’ उत्पादने बनवणारे काही खूप मोठे आणि प्रसिद्ध ब्रँडस् पुण्यात सुरू झाले. ‘मदर्स रेसिपी’ हा त्यातला एक महत्त्वाचा ब्रँड. प्रत्येक राज्यात आपल्याशा वाटणाऱ्या चवींबद्दल आणि तिथल्या पारंपरिक लोणची-मसाल्यांबद्दल संशोधन करून त्या प्रकारची उत्पादने या ब्रँडने आणली आणि देशासह परदेशातही ती ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहेत.
‘मदर्स रेसिपी’ या ब्रँडची उत्पादने आपल्याला अजिबात नवीन नाहीत. पण हा ब्रँड पुण्यातील एका कुटुंबाच्या समूहाकडून चालवला जातो आणि त्याची उत्पादने शिरवळजवळ बनतात, हे मात्र अनेकांना माहीत नसते. वेगवेगळ्या प्रदेशातील चवी आपल्या उत्पादनांमध्ये उपलब्ध करून देणे हे या ब्रँडचे वैशिष्टय़ असून ही उत्पादने ४५ देशांत निर्यात होत आहेत.
‘मदर्स रेसिपी’ हा ‘देसाई ब्रदर्स लिमिटेड’चा ब्रँड आहे. पुण्यातील देसाई कुटुंबाचा देसाई समूह तंबाखूजन्य उत्पादने, रसायने, आरोग्य सुविधा, हॉस्पिटॅलिटी अशा विविध क्षेत्रांत कार्यरत आहे. चौदा-पंधरा वर्षांपूर्वी व्यवसायवृद्धीच्या प्रयत्नात असताना खाद्यपदार्थाच्या व्यवसायात उतरण्याचे त्यांनी ठरवले आणि २००२ मध्ये ‘मदर्स रेसिपी’ हा ब्रँड विकत घेतला. हा ब्रँड मूळचा मुंबईचा होता. त्या वेळी त्यांची उत्पादने प्रामुख्याने मुंबईत मिळत आणि एक-दोन देशांतही निर्यात होत असत. देसाईंनी हा ब्रँड घेतल्यानंतर पुणे-बंगळुरू महामार्गावर सारोले येथे त्यांचा कारखाना उभा राहिला. ‘मदर्स रेसिपी’ची सर्व उत्पादने या ठिकाणी बनतात.
लोणची आणि मसाल्यांचा व्यवसाय हा प्रचंड स्पर्धेचा. प्रत्येक राज्यात त्या-त्या ठिकाणचे काही मोठे ब्रँडस् कार्यरत असतात. शिवाय अगदी बचत गटांपर्यंत अनेक लहान ब्रँडस् देखील लोणची-मसाले आणि ‘रेडी टू कुक’ उत्पादनांमध्ये आहेत. अशा परिस्थितीत आपला ब्रँड देशभर पोहोचवण्यासाठी ‘मदर्स रेसिपी’ने आपली काही वैशिष्टय़े निर्माण केली. त्यांनी प्रत्येक प्रदेशातील खास पदार्थ उपलब्ध करून दिले. त्यासाठी त्या-त्या ठिकाणच्या लोणची व मसाल्यांमध्ये कोणते घटक वापरले जातात, त्याचा अभ्यास त्यांना करावा लागला. लोणच्यात कोणते तेल वापरायचे, मिरची कोणती हवी, प्रमुख मसाले कुठले याची काळजी घेतली जाऊ लागली आणि तिथल्या ग्राहकांच्या पसंतीस पडतील अशी उत्पादने त्यांनी आणली. कैरीचे लोणचे म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर आपले महाराष्ट्रीयन पद्धतीचेच कैरीचे लोणचे येते. पण गुजरात, राजस्थान, पंजाब, बंगाल, चेन्नई, केरळ, आंध्र अशा ठिकठिकाणच्या कैरीच्या लोणच्याची चव वेगळी असते. अशी प्रत्येक चवीची लोणची ‘मदर्स रेसिपी’ बनवते. पश्चिम बंगालमध्ये स्वयंपाकात वापरले जाणारे ‘पंच फोरन’ मसाले वापरून आणि तिथल्या काही कुटुंबांकडील पदार्थाच्या नोंदवह्य़ा पाहून त्यांच्या चवीची लोणची आणि मोहरीची पेस्ट वापरलेली ‘कासुंदी’ नावाची चटणी कशी बनवली गेली, त्याची गोष्ट कंपनीच्या व्यवसायवृद्धी विभागाच्या प्रमुख संजना देसाई सांगतात.
आता ‘मदर्स रेसिपी’ची उत्पादने देशात सर्वत्र मिळतात आणि ४५ देशांत निर्यातही होतात. विविध चवींचे मसाले, लसूण आणि आल्याच्या पेस्टसारख्या ‘कुकिंग पेस्ट’ ‘चाट’साठी वापरल्या जाणाऱ्या चटण्या, ‘रेडी टू कुक’ मसाले, कांदेपोहे, उपमा, खीर यासारखे ‘रेडी टू कुक’ पदार्थही ते बनवतात. या महिन्यात कांदेपोहे आणि ‘नो ओनियन नो गार्लिक पोहे’ ‘इन्स्टंट कप पोहे’ या स्वरूपात आणायचे त्यांचे नियोजन आहे.
पुण्यात कसबा पेठ आणि एसजीएस मॉल येथे त्यांची रीटेल दुकाने आहेत. या व्यवसायासाठी पुणे हे खूप महत्त्वाचे ‘मार्केट’ असल्याचे संजना सांगतात. देशात त्यांचे सहाशे वितरक आहेत. उत्पादनांच्या विक्रीसाठी त्यांचे स्वत:चे ‘ई-कॉमर्स स्टोअर’ देखील आहे. शिवाय खाद्यपदार्थाची विक्री करणाऱ्या तीस संकेतस्थळांवरही ‘मदर्स रेसिपी’ उत्पादने मिळतात. आजच्या काळाशी जुळवून घेताना ‘डिजिटल मार्केटिंग’ त्यांना महत्त्वाचे वाटते. पदार्थाची माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी फेसबुकसारख्या संकेतस्थळांचाही ते वापर करतात.
sampada.sovani@expressindia.com