पानिपतच्या यशस्वी मोहिमेनंतर सशक्त भारत संघटनेतर्फे यंदा पूर्वोत्तर भारत मैत्री अभियान सुरू केले जात असून त्यासाठी नाशिक, पुणे, कोलकातामार्गे दार्जिलिंग, तवांग अशी साडेचार हजार किलोमीटरची चला जाऊ या पूर्वाचलात ही मोटारसायकल मोहीम आयोजित करण्यात आली आहे.
युवक, युवतींच्या मनात देशप्रेम जागृत करणारे विविध साहसी उपक्रम सशक्त भारत संघटनेतर्फे आयोजित केले जातात. संघटनेने यंदा २१ सप्टेंबर ते ९ ऑक्टोबर दरम्यान आठ राज्य आणि ४५ जिल्ह्य़ांतून प्रवास करणारी दुचाकी मोहीम आयोजित केली असून १८ ते ३५ वयोगटातील युवक, युवती मोहिमेत सहभागी होऊ शकतील. भारत-चीन युद्धात देशासाठी शहीद झालेल्या भारतीय जवानांना अभिवादन, अरुणाचल प्रदेशात साडेनऊ हजार फुटांवर तवांग येथील श्री छत्रपती शिवाजीमहाराजांच्या पुतळ्याला साक्षी ठेवून भारतमातेची शपथ, स्वामी विवेकानंदांच्या दीडशेव्या जयंती वर्षांनिमित्त बंगालमध्ये जाऊन त्यांच्या भूमीत त्यांना अभिवादन, सयाजीराव गायकवाड यांच्या दीडशेव्या जयंती वर्षांनिमित्त त्यांच्या जन्मगावाला भेट, मेघालयाचे आद्य क्रांतिकारक कियांगजी यांच्या हौतात्म्याचे स्मरण, नागालँडच्या पहिल्या महिला क्रांतिकारक गाईदिन्ल्यू माँ यांच्या भूमीत जाऊन त्यांच्या पराक्रमाचे स्मरण अशी या मोहिमेची वैशिष्टय़ आहेत.
मोहिमेतील प्रवासात स्वामी विवेकानंद भूमी, ऐतिहासिक बडम बाजार गुरुद्वारा, भगिनी निवेदिता यांचे समाधिस्थळ, कामाख्या मंदिर आदी अनेक ऐतिहासिक, धार्मिक स्थळांना भेटी देण्याचाही कार्यक्रम असून या साहसी मोहिमेत सहभागी होण्यासाठी संस्थेकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी अजित- ९८६०४५१७७७ किंवा संजय- ९६८९९४४०५८ यांच्याशी संपर्क साधावा, असे कळवण्यात आले आहे.

Story img Loader