प्रखर इच्छाशक्ती आणि आत्मविश्वास याच्या बळावर माणूस प्रतिकूलतेवरही मात करू शकतो. अपघातामध्ये पाय गमावल्यानंतर कृत्रिम पायाच्या आधारे माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करण्याची किमया अरुनिमा सिन्हा या युवतीने दहा महिन्यांपूर्वी साध्य केली. जिद्दीची ही यशोगाथा शुक्रवारी (२८ मार्च) अरुनिमा पुणेकरांसमोर उलगडणार आहे.
खरेतर तुमच्या आमच्यातीलच एक अरुनिमा सिन्हा. प्रचंड इच्छाशक्ती आणि जिद्द हे तिचे वेगळेपण. एक उत्तम व्हॉलिबॉलपटू असलेल्या अरुनिमा हिच्या आनंदी जीवनात काळाचे फेरे उलटले. या दुर्दैवी घटनेने अरुनिमाचे आयुष्यच बदलले. ११ एप्रिल २०११ रोजी अरुनिमा नोकरीच्या मुलाखतीसाठी दिल्लीहून पद्मावती एक्सप्रेसने लखनौकडे निघाली होती. मात्र, या प्रवासादरम्यान रेल्वेच्या डब्यामध्ये चोर घुसले. त्यांनी अरुनिमा हिच्या गळय़ातील साखळी चोरण्याचा प्रयत्न केला. त्यांना प्रतिकार करायला गेलेल्या अरुनिमा हिला चोरटय़ांनी धावत्या रेल्वेमधून खाली ढकलून दिले. समांतर असलेल्या दुसऱ्या रुळावर अरुनिमा जवळपास चार तास पडून होती. या चार तासांच्या कालावधीत तब्बल ४९ गाडय़ा तिच्या अंगावरून गेल्या. या प्रसंगातून अरुनिमा बचावली खरी, पण तिला आपला डावा पाय गमवावा लागला.
याच अरुनिमा हिने प्रखर इच्छाशक्तीच्या बळावर प्रशिक्षक बचेंद्री पाल यांच्या मार्गदर्शनाखाली एका कृत्रिम पायाने दोन वर्षांनी म्हणजेच २० मे २०१३ रोजी माऊंट एव्हरेस्ट शिखर सर केले. कृत्रिम पायाने एव्हरेस्ट सर करणारी अरुनिमा ही पहिली भारतीय महिला ठरली आहे. प्रतिकूलतेवर मात करून एव्हरेस्ट सर करणाऱ्या अरुनिमा हिच्या कर्तृत्वाचा लाईफ स्कूल फाऊंडेशनतर्फे शुक्रवारी सन्मान करण्यात येणार आहे. तिला ‘लाईफ स्कूल सॅल्यूट अॅवॉर्ड’ प्रदान करण्यात येणार असून, एक लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. गणेश कला क्रीडा मंच येथे सायंकाळी ७ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. प्रेरणादायी लोकांना एकत्र आणण्याचे काम करणाऱ्या लाईफ स्कूल फाऊंडेशनचे संस्थापक नरेंद्र गोईदानी यांचे ‘व्हॉट्स युवर माऊंट एव्हरेस्ट’ या विषयावर उत्तरार्धात व्याख्यान होणार आहे.