गिर्यारोहण आणि ट्रेकिंग ही क्षेत्रे देशात झपाटय़ाने लोकप्रिय होत आहेत. या दोन्ही क्षेत्रात खास बनवलेले टिकाऊ तंबू आणि मोठय़ा सॅक अशा वस्तूंची आवश्यकता मोठी असली, तरी त्यातील बहुतेक उत्पादक परदेशीच. या परदेशी उत्पादनांना पुण्यातील एका उत्पादकाने दर्जेदार देशी पर्याय उपलब्ध करून दिला आहे. मुफद्दल लोखंडवाला असे त्यांचे नाव. भवानी माता मंदिराजवळ जुना मोटार स्टँडसमोर त्यांचे दुकान आहे. त्यांची उत्पादने मात्र मनाली आणि उत्तरकाशीपासून एव्हरेस्ट मोहिमांपर्यंत वापरली जातात.
मुफद्दल लोखंडवाला हे खरे तर वाणिज्य शाखेचे पदवीधर आणि एमबीएचे शिक्षण घेतलेले. परंतु व्यवसायाच्या वृत्तीचे बाळकडू लोखंडवाला यांना घरातूनच मिळाले. त्यांचे वडील डॉक्टर, पण आजोबा व्यावसायिक होते. त्यामुळे व्यवसाय करायचा हे लोखंडवाला यांनी आधीच ठरवलेले. शाळा-कॉलेजपासून त्यांना ट्रेकिंगची खूप आवड. गिर्यारोहणातील बारकाव्यांचे त्यांनी प्रशिक्षण घेतले होते, तसेच सह्य़ाद्री पर्वतरांगांसह इतर ठिकाणीही गिर्यारोहण आणि ट्रेकिंगच्या मोहिमांमध्ये ते सहभागी होत होते. पण ही आवडच पुढे जाऊन आपल्या व्यवसायाचा भाग होईल आणि गिर्यारोहण उत्पादनांमधील परदेशी कंपन्यांशी आपली उत्पादने स्पर्धा करतील, असे त्यांना त्या वेळी कदाचित वाटले नसेल.
गिर्यारोहणासाठीची चांगल्या प्रतीची उपकरणे भारतात फारशी मिळत नाहीत, आणि त्यामुळे परदेशी बनावटीच्या उपकरणांवरच अवलंबून राहावे लागते, अशी चर्चा गिर्यारोहकांमध्ये नेहमी होत असे. गिर्यारोहक वापरतात ते तंबू, मोठय़ा व दणकट सॅक, स्लीपिंग बॅग या सगळ्याच्याच बाबतीत हा प्रश्न येत होता. इंग्रजीतील ‘ए’ अक्षराच्या आकाराचे त्रिकोणी तंबू भारतात बनतात. पण गोल घुमटाच्या आकाराचे खास गिर्यारोहणासाठीचे ‘जिओडेसिक’ तंबू कुणीच बनवत नव्हते. चीनमधून काही माल येत होता. परंतु त्याच्या दर्जाबद्दल तक्रारी असतात. या सर्व गोष्टींमधून लोखंडवाला यांना या व्यवसायाची कल्पना सुचली. केवळ गिर्यारोहणासाठीचीच उपकरणे बनवायची, बॅग आणि सॅक देखील खास ट्रेकिंगसाठीच्याच बनवायच्या असे त्यांनी ठरवले. ‘अॅडव्हेंचर स्पोर्ट्स इक्विपमेंट्स’ या नावाने त्यांनी व्यवसाय सुरू केला. तंबूंसाठी ‘जिप्सी टेंट्स’ आणि बॅग व सॅकसाठी ‘पीक’ हे दोन ‘ब्रँड’ आणले. यातील बॅग आधी आल्या आणि नंतर तंबूंचे उत्पादन सुरू झाले. ही सर्व उत्पादने लोखंडवाला यांच्या कोंढव्यातील कारखान्यात बनतात.
गिर्यारोहण मोहिमांसाठी १५ फूट व्यासाचा ‘बेस कॅम्प कम्युनिकेशन टेंट’ ते बनवतात. मोहिमांच्या ‘बेस कॅम्प’वर हा तंबू लावून त्यातून गिर्यारोहकांशी संवाद साधला जातो. सह्य़ाद्रीसारख्या भागात आणि हिमालयीन मोहिमांसाठी वापरले जाणारे तंबू वेगळ्या प्रकारचे असतात. आजूबाजूचे तापमान, पाऊस, वारा या सगळ्याच गोष्टींचा विचार हे तंबू बनवताना करावा लागतो. उष्ण प्रदेशात तंबूचे कापड एकेरी वापरले जाईल, पण तिथेच पाऊस पडत असेल तर दुहेरी आणि पाण्याला उत्तम रीतीने अवरोध करणारे कापड लागेल. हिमालयातील परिस्थिती पूर्णत: वेगळी. प्रचंड बर्फात आणि सोसाटय़ाच्या वाऱ्यात टिकण्यासाठी तंबू तितकाच मजबूत हवा, कापड दुहेरी आणि ओले होणार नाही असे हवे. केवळ गिर्यारोहणासाठीच नव्हे, तर ट्रेकिंग करणाऱ्यांनाही तंबू लागतात. रानावनात जाऊन तंबूत राहण्याची लोकप्रियताही वाढते आहे. लोखंडवाला यांनी या सर्व गोष्टी लक्षात घेऊन विविध रचनांचे तंबू बनवले. स्वच्छतागृहासाठीचा तंबू, वन्यजीव छायाचित्रकारांसाठी चारी बाजूस खिडक्या असलेला आणि झाडांमध्ये लपेल असा तंबू, आरामात राहता येईल असा ‘बंगलो टेंट’ असे कितीतरी प्रकार त्यांच्याकडे पाहायला मिळतात. देशभरातील अनेक मोठय़ा गिर्यारोहण संस्था, मनाली व उत्तरकाशी येथील व्यावसायिक त्यांचे तंबू वापरतात. भारतीय लष्करानेही हिमालयीन भागात त्यांचे तंबू वापरले आहेत. ‘गिरिप्रेमी’ गिर्यारोहण संस्थेने एव्हरेस्ट मोहिमेत ‘बेस कॅम्प’वर तसेच ‘साऊथ पोल’वर सात हजार फुटांहून अधिक उंचीवर लोखंडवालांचे तंबू वापरले होते.
तंबूंसाठीचा बराचसा कच्चा माल भारतात उपलब्ध होत नसल्याने लोखंडवाला यांना ते खास बनवून घ्यावे लागले, तर काही वस्तू परदेशातून येतात. परदेशी उत्पादनांचा त्यांनी अभ्यास केला. आपल्या तंबूंचा टिकाऊपणा तपासण्यासाठी ते डोंगराळ भागात जाऊन लावणे, तिथे राहून पाहणे, हा पुढचा भाग. या व्यवसायात थेट परदेशी कंपन्यांशी स्पर्धा आहे. तरीही अनेक अनुभवी गिर्यारोहक लोखंडवालांचे तंबू वापरणे पसंत करतात. तंबूंना २-३ वर्षांनी काही झाले, तर त्याची दुरुस्तीही ते करून देतात. कित्येक गिर्यारोहण संस्थांनी त्यांचे तंबू चार-चार वर्षे वापरले आहेत. भविष्यात ‘ऑनलाइन’ विक्री सुरू करण्याचा लोखंडवाला यांचा मनोदय आहे, तसेच त्यांना निर्यातीतही उतरायचे आहे.
sampada.sovani@expressindia.com