‘याद किया दिलने कहाँ हो तुम’, ‘पल पल दिल के पास’, ‘पिया तोसे नैना लागे रे’, ‘किसी नजर को तेरा इंतजार आज भी है’ यापासून ते ‘जरा सी दिल में दे जगह तू’ अशी श्रवणीय गीते ऐकताना गायकाच्या स्वराबरोबरच लक्षात राहतात ते माउथ ऑर्गनचे सूर. ‘शोले’ चित्रपटातील धून तर या वाद्यानेच सजली आहे. प्रसिद्ध माउथ ऑर्गनवादक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली १०६ जणांनी ही धून सादर केली असून ‘लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ने या अनोख्या विक्रमाची नोंद घेतली आहे.
कृषी महाविद्यालयाच्या शिरनामे सभागृहामध्ये जूनमध्ये हा आगळावेगळा कार्यक्रम झाला होता. त्यापूर्वी सुनील पाटील यांनी दोनशेहून अधिक लोकांना माउथ ऑर्गनवादनाचे धडे दिले होते. त्यापैकी १०६ जणांनी प्रत्यक्ष वादन केले. शोले चित्रपटातील धून सादरीकरणाबरोबरच भूप रागातील रचनेवर पाटील यांनी विकसित केलेली प्राणायामावर आधारित सूरक्रिया ही सामूहिक धून देखील त्यांनी सादर केली. सामूहिक वादन कलेतील या विक्रमाची लिम्का बुकने नोंद घेतली असून सुनील पाटील यांना त्यासाठीचे प्रमाणपत्र नुकतेच प्राप्त झाले आहे. पाटील हे सुरभि संगीत अकादमीच्या माध्यमातून माउथ ऑर्गन आणि बासरीवादनाचे शिक्षण देतात.
या विक्रमाचा बहुमान मिळाल्याबद्दल सुनील पाटील यांनी रविवारी (२९ डिसेंबर) पौड रस्त्यावरील मोरे विद्यालयासमोरील ब्रह्मे सभागृह येथे दुपारी तीन ते सायंकाळी सात या वेळात माउथ ऑर्गन वादनाची मोफत कार्यशाळा आयोजित केली आहे. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर प्रवेश असून इच्छुकांनी ९९२३१५५२६७ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.