शहराच्या विकास आराखडय़ातील गैरप्रकारांना विरोध करून शहरात मोठे जनआंदोलन उभे करण्याचा निर्णय भारतीय जनता पक्षाच्या शहर बैठकीत गुरुवारी घेण्यात आला. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस त्यासाठी रविवारी (१९ मे) पुण्यात येत असून त्यांच्या उपस्थितीत या आंदोलनाला सुरुवात होईल.
शहर भाजपची तातडीची बैठक गुरुवारी सकाळी बोलावण्यात आली होती. आमदार गिरीश बापट, माधुरी मिसाळ, पक्षाचे महापालिकेतील गटनेता अशोक येनपुरे, ज्येष्ठ नेते अनिल शिरोळे, स्थायी समितीचे सदस्य हेमंत रासने, योगेश मुळीक, मोनिका मोहोळ, तसेच माजी मंत्री दिलीप कांबळे, नगरसेवक गणेश बीडकर, मुक्ता टिळक या वेळी उपस्थित होते. विकास आराखडय़ाच्या मुद्यावर पक्षाने रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यासंबंधीची रूपरेषा या बैठकीत चर्चिली गेली. प्रदेशाध्यक्ष फडणवीस रविवारी पुण्यात येत असून विकास आराखडा या विषयावर ते सकाळी नऊ वाजता पक्षाच्या नगरसेवकांची बैठक घेणार आहेत. त्यानंतर सकाळी दहा ते दुपारी बारा या वेळेत ते स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी तसेच आराखडय़ाच्या विषयाशी संबंधित असलेल्यांबरोबर चर्चा करणार आहेत. त्यानंतर ते पक्षाची भूमिका व आंदोलनाचा कार्यक्रम जाहीर करतील.
आराखडय़ाच्या माध्यमातून जे गैरप्रकार झाले आहेत, त्यांच्या विरोधात पक्षाने मोठे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. आराखडय़ातील मुद्रणात झालेल्या चुकीमुळे शहरात दोन ऐवजी दीड एफएसआय लागू झाला असून त्यामुळे चालू असलेली अनेक बांधकामेही थांबणार आहेत. तसेच वाडय़ांचा आणि गावठाण भागाचा विकासही थांबणार आहे. विकास आराखडय़ात अनेक लोकोपयोगी आरक्षणे उठवून त्या जागा निवासी करण्यात आल्या आहेत. तसेच रस्त्यांचेही क्षेत्र कमी करण्यात आले आहे.
 या आणि अशा विविध गैरप्रकारांच्या विरोधात हे आंदोलन असेल. प्रदेशाध्यक्ष फडणवीस यांच्या उपस्थितीत ते सुरू करण्यात येणार आहे. आराखडय़ाचे स्वरूप नागरिकांना समजावून देण्यासाठी ठिकठिकाणी परिसंवाद, चर्चासत्रांचे आयोजन, नागरिकांकडून हजारोंच्या संख्यने हरकती-सूचना भरून घेणे आणि प्रत्यक्ष आंदोलन अशा तीन स्वरूपाचे कार्यक्रम शहरात करावेत, असा निर्णय गुरुवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. फडणवीस यांचे इतरही काही कार्यक्रम रविवारी होणार असून त्याबाबतही बैठकीत चर्चा झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा