राज्यभरातील प्राध्यापकांनी विद्यापीठांच्या परीक्षांवर टाकलेल्या बहिष्काराबाबत शासनाने आणि विद्यापीठांनी घेतलेली दिरंगाईची भूमिका आणि प्राध्यापकांचा हेका याबाबत आता विविध स्तरातून नाराजीचे सूर उमटू लागले असून विविध राजकीय, सामाजिक संघटनांनी प्राध्यापकांच्या बहिष्काराबाबत मंगळवारी निदर्शने केली.
प्राध्यापकांच्या एमफुक्टो या संघटनेने राज्यभरातील विद्यापीठांच्या परीक्षांच्या कामकाजावर बहिष्कार टाकला आहे. गेले ४४ दिवस प्राध्यापकांचा बहिष्कार कायम आहे. मात्र, शासनाने बहिष्कारी प्राध्यापकांबाबत कारवाईचे पाऊल उचलले नाही. प्राध्यापकांच्या बहिष्कारामुळे राज्यातील जवळपास सर्वच विद्यापीठांवर परीक्षा पुढे ढकलण्याची वेळ आली आहे. राज्यभरातील बहिष्कारी प्राध्यापकांबाबत आता विद्यार्थ्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर विविध संघटनांनीही प्राध्यापकांच्या बहिष्काराच्या निषेधार्थ आंदोलने सुरू केली आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुणे शहर शाखेने प्रध्यापकांच्या बहिष्काराच्या निषेधार्थ गाढवे घेऊन मोर्चा काढला. शासनाने प्राध्यापकांच्या बहिष्कारावर तोडगा न काढल्यास अखिल महाराष्ट्रीय सेट-नेट, बी.एड, डी.एड पात्रताधारक संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे. महाराष्ट्रात १३ हजारहून अधिक नेट-सेट पात्रताधारक उमेदवार बेकार असून प्राध्यापकांनी बहिष्कार मागे घेतला नाही, तर ते परीक्षांचे कामकाज पार पाडू शकतात, असे संघटनेने म्हटले आहे.
प्राध्यापकांच्या परीक्षेच्या कामकाजावरील बहिष्काराबाबत विद्यार्थ्यांमध्येही नाराजीचे सूर उमटत आहेत. विज्ञान शाखेच्या तृतीय वर्षांच्या विद्यार्थ्यांने सांगितले, ‘‘आमच्या परीक्षा पुढील आठवडय़ापासून सुरू होणार आहेत. मात्र, प्राध्यापकांनी केलेल्या आंदोलनामुळे त्याबाबत अनिश्चितता आहे. आम्हाला शिकवणारेच प्राध्यापक त्यांच्या बहिष्कारामुळे परीक्षांबाबत अनिश्चितता असल्याचे आम्हाला सांगत आहेत.’’ वाणिज्य शाखेच्या तृतीय वर्षांच्या एका विद्यार्थ्यांने सांगितले, ‘‘परीक्षा लांबल्यामुळे निकालही लांबू शकतात. हा प्रश्न फक्त महाराष्ट्रातच असल्यामुळे निकाल लांबले तर पुढील शिक्षणासाठी बाहेरच्या राज्यात प्रवेश घेताना अडचणी निर्माण होणार आहेत. मला दुसऱ्या राज्यातील एका विद्यापीठामध्ये प्रवेश घ्यायचा आहे. मात्र विद्यापीठाचे निकाल उशिरा लागले तर त्यामध्ये अडचणी येणार आहेत.’’
 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा