आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये संपूर्ण राज्याचं बारामती विधानसभा मतदार संघावर सर्वांचं लक्ष असणार असून या मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार गटाकडून योगेंद्र पवार हे निवडणुक लढवित आहे.या दोन्ही उमेदवारांनी आज अर्ज दाखल केला आहे. बारामतीमधून काका जिंकणार की पुतण्या याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. त्याच दरम्यान आज हडपसर विधानसभा मतदार संघातून शरद पवार गटाचे उमेदवार प्रशांत जगताप, अजित पवार गटाचे उमेदवार विद्यमान आमदार चेतन तुपे आणि मनसेचे उमेदवार साईनाथ बाबर या तीनही उमेदवारांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी तीनही पक्षातील शहरातील नेत्यांनी हजेरी लावल्याचे पाहण्यास मिळाले.
शरद पवार गटाचे प्रशांत जगताप यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी खासदार अमोल कोल्हे यांनी उपस्थितीत लावली. तो अर्ज दाखल केल्यानंतर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधी सोबत त्यांनी संवाद साधl राज्यातील एकूणच परिस्थितीवर त्यांनी भाष्य देखील केले. ” पक्षात फुट पडल्यानंतर राज्यातील हजारो पदाधिकारी, कार्यकर्ते शरद पवार यांच्या सोबत राहिले. त्यामुळे लोकसभा निवडणुकीमध्ये एवढ्या प्रमाणावर यश मिळाले आहे. आता आगामी विधानसभा निवडणुकीत देखील अशाच प्रकारे यश राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाला मिळणार आहे. या पक्षातील हडपसर विधानसभा मतदार संघात प्रशांत जगताप हे प्रचंड मतांनी विजयी होतील ” असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
हे ही वाचा… चिंचवड विधानसभा मतदारसंघातून शंकर जगतापांनी भरला उमेदवारी अर्ज; राहुल कलाटेंवर केली टीका..
अजित पवार यांनी विकास कामं केली आहेत. तरी देखील योगेंद्र पवार विजयी होतील का ? त्या प्रश्नावर कोल्हे म्हणाले ” चकाचक इमारती म्हणजे विकास असतो का ? जर या इमारती उभा करण्याला विकास म्हणत असाल तर अजितदादांनी फार चांगल्या इमारती उभ्या केल्या असल्या, तरी शरद पवार यांनी पाच दशकं माणसं आणि कुटुंब उभी केली आहेत. त्यामुळे माणसं उभा करणार्याला विकास म्हणायचं की इमारती उभा करणार्याला विकास म्हणायचं ? त्यामुळे आता बारामतीमधील जनता ठरवेल ” अशा शब्दात कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्यांनी टोला लगावला.
बारामती विधानसभा मतदार संघातून अजित पवार यांचा पराभव व्हावा असे अमोल कोल्हे यांना वाटते का ? त्या प्रश्नावर ते म्हणाले की, मला एकच वाटत ते म्हणजे शरद पवार साहेबांच्या विचाराचा विजयी झाला पाहिजे. ही लढाई सुरू असून जेव्हा सगळं संपलेल असतं त्यावेळी एक ८४ वर्षाचा एक योद्धा मी लढतोय, हे दाखवितो. ती एक महाराष्ट्रातील तरुणाईला दिलेली प्रेरणा आहे. ती प्रेरणा हरून चालणार नसल्याची भूमिका त्यांनी मांडली.
हे ही वाचा… विमानात बाँम्बची अफवा; पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल, अफवा पसरविण्याचे प्रकार वाढीस
तसेच ते पुढे म्हणाले की भाजपचे ज्येष्ठ नेते गृहमंत्री अमित शाह हे आजवर ज्यावेळी आपल्या राज्यात आले आहेत त्यावेळी त्यांनी स्वावलंबन बळाचा नारा दिला आहे. २०२९ मध्ये ते स्वबळावर येण्याचा प्रयत्न करणार, पण एवढा मोठा धोका पत्करून एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे पलीकडे गेले आहेत. तर त्यांचा कडीपत्ता होऊ नये हीच त्यांच्या कार्यकर्त्यांची अपेक्षा असेल अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोल्हे यांनी टोला लगावला आहे.