पुणे: आगामी लोकसभा निवडणुकीला काही दिवस शिल्लक राहिले आहेत.पण भाजपकडून पहिली यादी जाहीर केली आहे.त्यामुळे इतर पक्ष देखील लवकरच उमेदवाराच्या नावाच्या याद्या जाहीर करतील अशी शक्यता आहे.त्यामध्ये महाराष्ट्र मध्ये भाजप,शिवसेना आणि राष्ट्रवादी अशी महायुती आहे.या तीन पक्षा च्या जागा वाटपाबाबत अद्यापपर्यंत अंतिम संख्या ठरलेली नाही.पण महायुतीमधील शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला ८ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार गटाला ३ जागा मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
त्या जागा वाटपाबाबत शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांना विचारले असता ते म्हणाले की, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात ज्यावेळी फुट पाडण्याचा प्रयत्न झाला.त्यावेळी एक गोष्ट निश्चित झाली होती.ती म्हणजे केंद्रातील भाजप सरकारला प्रादेशिक पक्ष संपविण्याची आसुरी महत्वकांक्षा असल्याच स्पष्ट झाले होते.आता लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपात एकनाथ शिंदे गटाला ८ आणि अजित पवार गटाला ३ एवढय़ाच जर जागा मिळत असतील, तर त्यांच्या प्रत्येक कार्यकर्त्यांच्या मनामध्ये एक प्रश्न पडत असेल की,याचसाठी केला होता का अट्टहास अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्यांनी सुनावले.
तसेच ते पुढे म्हणाले की,आपण स्वगृही होता. त्यावेळी राजासारखी वागणूक होती. आता जर ८ आणि ३ जगावर बोळवण केली जात असेल तर एवढा प्रवास केल्याचे फलित काय असा सवाल उपस्थित करीत पुन्हा एकदा अजित पवार यांना टोला लगावला.