पुणे : अजित पवार यांचे कट्टर समर्थक असलेले आमदार नीलेश लंके राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा ही अफवा असल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केल्यानंतर अवघ्या काही तासांतच लंके आणि शिरूरचे खासदार डाॅ. अमोल कोल्हे यांची शासकीय विश्रामगृह येथे भेट झाली. या भेटीनंतर डाॅ. कोल्हे यांनी सूचक वक्तव्य केले. शिवपुत्र संभाजी या महानाट्यासंदर्भात ही भेट होती. मात्र अस्वस्थ असणारे अनेक लोक आहेत. त्यामुळे त्याबाबत थोडी प्रतीक्षा केल्यानंतर सर्व काही स्पष्ट होईल, असे डाॅ. कोल्हे यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर अजित पवार यांच्यासमवेत गेलेले आमदार नीलेश लंके राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. मात्र असा कोणताही पक्षप्रवेश होणार नसून, या सर्व अफवा असल्याचे शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले होते. मात्र त्यानंतर काही तासांतच लंके आणि खासदार डाॅ. कोल्हे यांची शासकीय विश्रामगृह येथे भेट झाली. त्यामुळे त्यांच्या पक्षप्रवेशाबाबत पुन्हा उलट-सुलट चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली.
हेही वाचा >>>भाजपच्या कॉर्पोरेट आश्रयदात्यांना वाचवण्याचा एसबीआयचा प्रयत्न; इंडिया आघाडीचा आरोप
या संदर्भात डाॅ. कोल्हे यांना विचारणा केली असताना ते म्हणाले, की शिवपुत्र संभाजी महानाट्यासंदर्भात ही भेट होती. मात्र अस्वस्थ असणारे अनेक लोक आहेत. त्यामुळे या संदर्भात प्रतीक्षा केल्यानंतरच सर्व काही स्पष्ट होईल. त्याबाबत अद्याप कोणतीही माहिती नाही.
दरम्यान, वडिलांना त्रास होतो तेव्हा ठामपणे सर्व उभे राहतात. त्यामुळे शरद पवार यांच्यासमवेत सर्वसामान्य माणूस आहे. पक्षातून फुटलेल्यांना पुन्हा पक्षात घेण्याबाबतचा निर्णय शरद पवार घेतील, असे त्यांनी सांगितले.