नारायणगाव : पुणे-नाशिक महामार्गावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले असल्याने ते वाहतुकीसाठी धोकादायक झाले आहेत. रस्त्याची दुरुस्ती येत्या दहा दिवसांत पूर्ण न केल्यास त्या खड्ड्यांमध्ये संबंधित अधिकारी आणि ठेकेदाराच्या नावासह मोबाइल क्रमांकाचे फलक लावले जातील, असा इशारा खासदार अमोल कोल्हे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या बैठकीत दिला.
पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील राजगुरुनगर ते आळे फाटा (पुणे जिल्हा हद्द) दरम्यान पर्यायी रस्त्याची कामे आणि सुरक्षा विषयक उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी खासदार कोल्हे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी आणि संबंधित ठेकेदारांची नुकतीच बैठक घेतली. या बैठकीला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अनिल गोरड, दिलीप शिंदे आणि सर्व कंत्राटदार प्रतिनिधी उपस्थित होते.
कोल्हे यांनी या बैठकीत रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांचा आणि त्यामुळे धोकादायक झालेल्या वाहतुकीचा मुद्दा प्रामुख्याने मांडला. रस्त्यांची कामे करणाऱ्या कंत्राटदारांवरच देखभाल दुरुस्तीची जबाबदारी आहे. त्यामुळे खड्डे पडल्यावर नागरिकांच्या तक्रार येण्याची वाट न पाहता स्वतःहून जबाबदारीने पुढील दहा दिवसांत दुरुस्तीची कामे पूर्ण करा. अन्यथा, या खड्ड्यांत कंत्राटदार-अधिकाऱ्यांची नावे आणि मोबाइल क्रमांक टाकून फलक लावण्यात येतील, असा इशारा त्यांनी दिला. तुम्ही देखभाल दुरुस्तीसह कामांचे पैसे घेता, तर मग काम जबाबदारीने करायला हवे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी नियमितपणे या रस्त्यावरून प्रवास करतात, त्यांना रस्त्याची दुरवस्था दिसत नाही का?, असे सवाल करीत रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीच्या कामांवर लक्ष ठेवण्यासाठी द्रुतगती मार्गाच्या धर्तीवर संबंधित कंत्राटदाराने गस्तीची यंत्रणा कार्यान्वित करावी, अशी सूचना कोल्हे यांनी बैठकीत केली.