पुणे : पाणीपुरवठा सुरळीत करावा, यासाठी वारंवार पाठपुरावा करूनही नागरिकांना पाणी मिळत नसल्याने थेट महापलिकेसमोर उपोषण करण्याचा इशारा देणाऱ्या खासदार अनिल शिरोळे यांनी काही तासातच आपले शस्त्र म्यान केले. पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन हा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन महापौर मुक्ता टिळक यांनी दिल्याने उपोषण मागे घेत असल्याचे शिरोळे यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शहरातील अनेक भागात गेल्या काही दिवसापासून पाण्याची समस्या जाणवत आहे. शिरोळे यांचे वास्तव्य असलेल्या शिवाजीनगर-मॉडेल कॉलनी प्रभागातही पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून मध्यवर्ती भाग असतानाही पुरेसे पाणी मिळत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. पाणीपुरवठा सुरळीत करावा यासाठी या भागातील नागरिकांनी शिरोळे यांची भेट घेतली होती. महापालिकेतील अधिकाऱ्यांशी शिरोळे यांनी चर्चा केली होती.

मात्र, त्यानंतरही पाणीपुरवठा सुरळीत न झाल्याने नागरिकांनी शिरोळे यांच्या कार्यालयात आंदोलन केले होते. त्यानंतर शिरोळे यांनी महापालिका आयुक्त सौरव राव यांच्यासह पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांना दूरध्वनी केले होते. परंतु,कोणी प्रतिसाद दिला नाही. महापालिकेत एकहाती सत्ता असतानाही भाजपच्या खासदाराचे प्रश्न सुटत नसतील तर सामान्य नागरिकांचे काय, असा सवाल उपस्थित केला गेला. त्यामुळे शिरोळे यांनी अखेर उपोषणाचे हत्यार उपसले होते. महापालिकेत शनिवारी उपोषणाला बसणार असल्याचे त्यांनी जाहीर  केले होते. या उपोषणाची चर्चा सर्वत्र झाल्याने भाजपच्या पदाधिकाऱ्यांची कोंडी झाली होती. अखेर महापौर मुक्ता टिळक यांनी शिरोळे यांच्याशी चर्चा करून अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येईल, अशी हमी दिली. त्यानंतर उपोषण मागे घेण्यात आल्याचे शिरोळे यांनी जाहीर केले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mp anil shirole hunger strike end in a few hours
Show comments