पिंपरी-चिंचवड शहराचा आगामी २० वर्षांत होणारा विकास, लोकसंख्यावाढ, नागरीकरणाच्या गरजा लक्षात घेऊन सुधारित विकास आराखडा तयार केला जात आहे. या आराखड्याचे काम वेगात पूर्ण करून मान्यतेसाठी तो राज्य सरकारकडे पाठवावा, अशी सूचना खासदार श्रीरंग बारणे यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना केली. राज्य सरकारशी संबंधित असलेले प्रस्ताव तातडीने पाठवावेत. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून ते निकाली काढू, अशी ग्वाही बारणे यांनी दिली.
हेही वाचा >>> पुणे : अतिवृष्टी बाधितांसाठी तीन कोटी १८ लाखांचा निधी प्राप्त
खासदार बारणे यांनी मंगळवारी महापालिका आयुक्तांची भेट घेतली. या बैठकीसंदर्भात बारणे म्हणाले,की पूर्णत्वाकडे आलेली कामे जनतेसाठी खुली करावीत. स्मार्ट सिटीतील प्रलंबित कामे तत्काळ मार्गी लावावीत. सायन्स पार्कच्या विस्तारित कामाला गती द्यावी. पवना नदी सुधारच्या कामाला सुरुवात करावी. केजूबाई बंधारा ते मोरया गोसावी मंदिरापर्यंतच्या पहिल्या टप्प्यातील भागाचे काम तत्काळ सुरू करावे, अशा सूचना आयुक्तांना केल्या आहेत.
ताथवडे येथे रुग्णालय, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे आरक्षण आहे. ते ताब्यात घेण्यासाठीचा सुधारित प्रस्ताव पालिकेकडून राज्य शासनाला पाठवावा. प्राधिकरणातील कचरा संकलन केंद्र स्थलांतरित करावे. पुनर्वसन झालेल्या जागी पुन्हा झोपडपट्टी होऊ नये, याची खबरदारी घ्यावी.
हेही वाचा >>> पुणे : सदनिकांच्या विक्री करारनाम्यांच्या नोंदी आता सुलभ ; दोन वर्षांत सात हजार सदनिकांची नोंद
‘रुबी एल केअर’ची चौकशी करा
यशवंतराव चव्हाण रुग्णालयात रुबी एल केअरच्या माध्यमातून सिटी स्कॅनसह इतर उपचार केले जातात. नवीन थेरगाव रुग्णालयात परवानगी नसताना अशा उपचार सुविधा या कंपनीने सुरू केल्या आहेत. पालिका अधिकाऱ्यांना हाताशी धरुन नागरिकांकडून जास्तीची बिले आकारली जात आहेत. चुकीच्या पद्धतीने कामकाज करणाऱ्या रूबी एल केअरची चौकशी करावी, अशी मागणी खासदार बारणे यांनी आयुक्तांना केली.