पुणे : हडपसर रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी खासदार गिरीश बापट यांनी लोकसभेत केली. लोकसभेत कलम ३७७ अन्वये मुद्दा उपस्थित करून या मागणीकडे बापट यांनी केंद्र सरकारचे लक्ष वेधले.
गेल्या काही वर्षात प्रवाशांची आणि गाड्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे. पुणे रेल्वे स्थानकावरून नवीन गाड्या धावणे शक्य होत नाही. त्यामुळे पुणे रेल्वे स्थानकाऐवजी हडपसर सारख्या पर्यायी स्थानकावरून गाड्या सुरु करणे आवश्यक आहे. पुणे जंक्शनवरून सुमारे १५० लांब पल्ल्याच्या गाड्या धावतात. यापैकी काही गाड्या हडपसर येथून सोडल्यास पुणे जंक्शनवरील भार कमी होईल, असे बापट यांनी सांगितले.
बापट म्हणाले की, पुणे रेल्वे स्थानकावरील गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वे काही गाड्या हडपसरला हलवत आहे. सध्या हडपसर ते हैदराबाद ही विशेष रेल्वे हडपसर स्थानकावरून धावते. परंतु हडपसर रेल्वे स्थानकावर चार फलाट असून प्रवाशांसाठी एक फूट ओव्हरब्रिज आहे. स्थानकावर थांबणाऱ्या गाड्यांमधील प्रवाशांना रेल्वे स्थानकात सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध नसल्यामुळे इच्छित स्थळी पोहचण्याकरीता वैयक्तिक किंवा खासगी प्रवाशी वाहनाचा वापर करावा लागत असल्याने नागरिकांना आर्थिक भार सहन करावा लागत आहे.
त्याचप्रमाणे स्थानकावर प्रवाशांना वाहने उभी करण्यासाठी वाहनतळाची जागा कमी असल्याने जागा उपलब्ध करून वाहनतळ विकसित करावे, मुख्य रस्त्यापासून स्थानकाकडे जाणारे रस्ते हे अरुंद असल्याने स्थानकाकडे जाणा-या रस्त्याचे रुंदीकरण करावे, प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टीने स्थानक इमारत आणि आरक्षण केंद्र इमारत उभारावे, सध्या स्थानकावर प्रवाशांकरिता पत्र्याच्या शेडमध्ये प्रतीक्षालय करण्यात आले आहे, ते सुसज्य इमारतीत करावे. जेष्ठ नागरिकांना साहित्य घेवून जिना चढणे शक्य नसल्याने स्वतंत्र व्यवस्था करावी. सुविधांचा अभाव असल्याने प्रवाशांची होत असलेली गैरसोय दूर करण्यासाठी या सुविधा तातडीने उपलब्ध करण्याची गरज आहे. त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याकरीता केंद्र शासनाने तातडीने पावले उचलावीत.