पुणे: प्रकृती अस्वस्थ्यामुळे खासगी रुग्णालयात उपचार घेणारे पुण्याचे खासदार गिरीश बापट यांना रुग्णालयातून सोडण्यात आल्यानंतर त्यांनी थेट कसबा पेठेतील जनसंपर्क कार्यालय गाठले. कार्यकर्त्यांची विविध प्रश्नासंदर्भात त्यांनी चर्चा केली. आजारी असातनाही बापट जनसंपर्क कार्यालयात उपस्थित राहिल्याने कार्यकर्त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. पुण्याच्या राजकारणावर छाप असलेले खासदार गिरीश बापट यांच्यावर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांना श्वसनाचा त्रास असल्याचे सांगितले जात आहे.
हेही वाचा >>> कसबा पेठ व चिंचवडची जागा भाजपा कायम राखणार का?
बापट रुग्णालयात असल्याचे समजल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विधानपरिषदेच्या उपसभापती डाॅ. नीलम गोऱ्हे यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील अनेकांनी बापट यांची रुग्णालयात जाऊन प्रकृतीची विचारपूस केली होती. गेल्या दीड महिन्यांपासून बापट यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. प्रकृती सुधारत असल्याने त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले. त्यानंतर रात्री त्यांनी कसबा पेठेतील जनसंपर्क कार्यालय गाठले. खासदार गिरीश बापट कार्यालयात आल्याचे समजताच कार्यकर्त्यांची गर्दी होण्यास सुरुवात झाली. काही मिनिटातच हजारो कार्यकर्ते कार्यालयात उपस्थित राहिले. या सर्वांबरोबरच बापट यांनी चर्चा केली. विशेष म्हणजे पूर्ण बरे वाटत नसतानाही बापट कार्यालयात उपस्थित राहिल्याने कार्यकर्त्यांकडूनही आश्चर्य व्यक्त करण्यात आले.