नारायणगाव : महाराष्ट्राची लोककला असलेल्या लोकनाट्य तमाशा फडातील कलावंतांच्या काही मागण्या असून त्यासंदर्भात खा. शरद पवार यांच्या माध्यमातून आपणासह शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे केंद्रीय सांस्कृतीक मंत्र्यांची भेट घेऊन या मागण्यांची तड लावणार असल्याचे खा. नीलेश लंके यांनी नारायणगाव येथे सांगितले.नीलेश लंके प्रतिष्ठानच्या माध्यमातून गड, किल्ले संवर्धन मोहिमेचा शुभारंभ करून परतताना खा. लंके यांनी नारायणगांव येथील तमाशा पंढरीस भेट देऊन तेथील कलाकरांच्या समस्या जाणून घेतल्या.
यावेळी बोलताना खा लंके म्हणाले, केंद्रीय सांस्कृतिक मंत्र्यांकडे कलावंतांच्या काही मागण्या आहेत. तमाशा कलावंतांना पॅकेज मिळाले पाहिजे ही एक प्रमुख मागणी आहे. सध्या दिल्लीत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या विभागाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे व शरद पवार यांच्या माध्यमातून आपण केंद्रीय सांस्कृतीक मंत्र्यांसमवेत लवकरच बैठक घेणार आहोत. त्यासाठी तमाशा कलावंतांच्या शिष्टमंडळालाही बोलविण्यात येणार असल्याचे खा. लंके यांनी सांगितले.
तमाशा ही लोककला लोप पावत चालली आहे. ही पारंपारिक लोककला जिवंत राहिली पाहीजे असे माझ्यासारख्या कार्यकर्त्याचे मत आहे. तमाशा कलावंत आणि माझं आपुलकीचं नाते आहे . ज्यावेळी कोव्हीडची महामारी आली, त्यावेळी याच तमाशा कलावंतांनी आमच्या भाळवणी येथील शरदचंद्र पवार आरोग्य मंदिरात मनोरंजनाचे कार्यक्रम घेऊन अनेक रूग्णांना कोरोनातून बाहेर काढले. तमाशा कलावंतांच्या व्यथा, अडीअडचणी मला माहीती आहे. तमाशा कलावंतांच्या वाहनांकडून टोल आकारला जाऊ नये ही छोटीशी मागणी आहे. ज्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या वाहनांसाठी आपण आग्रही असतो तशीच भूमिका तमाशा कलावंतांसाठीही असल्याचे खा. लंके यांनी स्पष्ट केले.
कलावंतांचे मानधही मिळत नाही. कलाकाराचे ठराविक वय असते. त्या वयापलीकडे गेल्यानंतर या कलाकारांवर उपासमारीची वेळ येते. ठराविक वयात कलाकाराला जो मान-सन्मान मिळतो तो त्याला आयुष्यभर मिळाला पाहिजे. त्यासाठी खास उपाययोजना झाली पाहिजे , कलाकारांना गेल्या सहा महिन्यांपासून मानधन मिळत नाही. मागील आठवडयात कलावंतांच्या मानधनाबाबत आपण संबंधित मंत्र्यांना पत्र दिले आहे. या प्रश्नाकडे लक्ष देण्यासाठी सरकारकडे वेळ नाही अशी खंत लंके यांनी व्यक्त केली .
खा. नीलेश लंके यांनी कोरोना बाधित रूग्णांसाठी शरदचंद्र पवार आरोग्य मंदिर सुरू केले होते. या आरोग्य मंदिराचा देशात नव्हे तर जगात बोलबाला झाला. हे आरोग्य मंदिर पाहण्यासाठी आम्ही गेलो असता तिथे खा. नीलेश लंके हे मोकळेपणाने फिरून कोरोना रूग्णांना धीर देत होते. आमच्यासोबतच्या तमाशा कलावंतांनी रूग्णांसाठी कला सादर केली. कार्यक्रमानंतर प्रत्येक कलाकाराला खा. लंके यांनी महिनाभर पुरेल इतके धान्य दिले. यावरून खा. लंके यांना तमाशा कलावंतांविषयी किती आस्था आहे याची कल्पना येते , अशी प्रतिक्रिया अखिल भारतीय मराठी तमाशा परिषदेचे अध्यक्ष संभाजीराजे जाधव यांनी यावेळी व्यक्त केली .