पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी पुण्यात सभा घेतली. यावेळी त्यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला. “माझी आणि पाटलांची मैत्री तुम्हाला माहिती आहे. मी जास्त काही बोलणार नाही. माझ्या आणि त्यांच्या मैत्रीतील प्रेमाखातर मी त्यांच्यावर फक्त सव्वा रुपयांचा दावा ठोकलाय,” असं संजय राऊत म्हणाले. चंद्रकांत पाटलांनी पीएमसी बँकप्रकरणी संजय राऊत आणि त्यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्यावर आरोप केल्यानंतर संजय राऊतांनी त्यांच्यावर सव्वा रुपयाचा अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचं म्हटलं होतं.
“सव्वा रुपयाचा दावा यासाठी की मला तुमचे शंभर कोटी नको, असं राऊतांनी म्हटलं. तसेच मी कोणताही खटला हरत नाही. मग तो कोर्टाचा असो की राजकारणाचा. तुम्हाला सव्वा रुपया मला जाहीरपणे द्यावा लागेल, असं ते चंद्रकांत पाटलांना म्हणाले. तसेच मी सव्वा रुपयाचा अब्रूनुकसानीचा दावा ठोकल्यानंतर मला बरेच जण म्हणाले, की तुम्ही फक्त एवढाच दावा का ठोकला. तर, मी शिवसैनिक आहे, माझी किंमत तुम्हाला मोजता येणार नाही, त्यामुळे तुम्हाला सव्वा रुपया मला जाहीरपणे द्यावा लागेल, असा टोला राऊतांनी पाटलांना लगावला.
आमची किंमत काय ते महाराष्ट्र आणि देश भविष्यात पाहील. पण तुमची किंमत काय ते सगळ्यांना दिसतंय, असंही ते म्हणाले. यावेळी बोलताना गुजरातचा मुख्यमंत्री पंतप्रधान होऊ शकतो, मग महाराष्ट्राचा का नाही, असा प्रश्न करत छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले आंबेडकर यांच्या भूमीतला माणूस देशावर नक्कीच राज्य करू शकतो, असंही राऊत म्हणाले.
दरम्यान, यावेळी राऊत म्हणाले, की “राजकारण खूप चंचल असतं. राजकारणात फक्त महिला निष्ठेने काम करतात. बाळासाहेब कायम महिलांचा सन्मान करायचे.” तसेच रोज सरकार पाडायच्या गोष्टी करणारे आता फक्त तारखा देतात, असं म्हणत त्यांनी भाजपाला टोला लगावला. यावेळी त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासोबतच एक किस्सा सांगितला. “शिवसेनेच्या यशाचं रहस्य काय आहे, असं मला राहुल गांधींनी विचारलं होतं. यावर मी त्यांना म्हटलं की आमची भाषा थोडी खराब आहे, पण कोणताही लढा देताना आम्ही मागे हटत नाही. माझ्यावर गुन्हे दाखल असताना मी प्रत्येक जिल्ह्यातील कोर्टात गेलो, बाळासाहेब माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिले, आमचा पक्ष कोणत्याही शिवसैनिकाला वाऱ्यावर सोडत नाही,” असंही राऊत म्हणाले.