रावेत बंधाऱ्यापासून ते चिंचवडच्या मोरया गोसावी घाटापर्यंत कोणतीही प्रक्रिया न करता सांडपाणी थेट पवना नदीपात्रात सोडले जात असून त्याकडे महापालिका अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आहे, अशी तक्रार खासदार श्रीरंग बारणे यांनी पिंपरी पालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे. खासदार बारणे यांनी याबाबत आयुक्तांना पत्र पाठविले आहे.
हेही वाचा >>> पुणे : नाताळ साजरा करण्यासाठी गेलेल्या कुटुंबाच्या सदनिकेतून २५ लाखांचा ऐवज चोरीस; महंमदवाडीतील घटना
पवना नदी क्षेत्रातील केजुदेवी बंधाऱ्याजवळ नुकतेच मोठ्या संख्येने मृत मासे आढळले आहेत. नदीपात्रातील पाणी दूषित आहे. ड्रेनेजचे पाणी थेट नदीपात्रात सोडले जात आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरते आहे. पवना नदीपात्रातील पाणी हे पिंपरी-चिंचवडकरांसाठी पिण्यासाठी वापरले जाते. नदीपात्रातील पाणी अशुद्ध होत असल्याने शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. यासंदर्भात गांभीर्याने लक्ष घालून योग्य ती कार्यवाही करावी, अशी सूचना खासदार बारणे यांनी आयुक्तांना या पत्राद्वारे केली आहे.