पिंपरी- चिंचवड: राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे काही आमदारांसह भाजप आणि शिंदे सरकारमध्ये सामील झाले आहेत. यामुळे शिंदे आणि भाजपच्या आमदार, खासदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झालेली आहे. असं असताना २०१९ मध्ये लोकसभेच्या निवडणुकीत अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचा पराभव करणारे शिवसेनेचे (शिंदे गटाचे) विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी मात्र अजित पवार हे आमच्या सरकारमध्ये सामील झाल्याने महायुतीची ताकद वाढल्याचं म्हटलं आहे. तसेच २०२४ मध्ये होणाऱ्या मावळ लोकसभेच्या उमेदवारीवर पुन्हा एकदा दावा केला आहे. ते पिंपरी- चिंचवडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२०१९ मध्ये ऐनवेळी अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना मावळ लोकसभेची उमेदवारी देण्यात आली. अजित पवार यांनी पार्थ पवार यांना निवडून आणण्यासाठी मोठी ताकद लावली. तरी देखील सध्याचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी पार्थ पवार यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला होता. याचे शल्य आजही अजित पवार यांच्या मनात असल्याचं बोललं जातं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार श्रीरंग बारणे हे एकमेकांचे कट्टर विरोधक मानले जातात. तेच अजित पवार काही आमदारांसह शिंदे- भाजप सरकारमध्ये सामील झाल्याने नेमकी बारणे यांची काय भूमिका असणार याकडे सर्वांचे लक्ष होतं. परंतु, त्यांनी अजित पवार यांच स्वागत करत महायुतीची ताकद वाढल्याचं वक्तव्य त्यांनी केला आहे.

आणखी वाचा-हडपसरचे आमदार चेतन तुपे यांचे घूमजाव? शरद पवार यांच्या बैठकीला उपस्थिती; अजित पवारांचीही भेट

श्रीरंग बारणे म्हणाले, राज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चांगलं काम करत होते. त्यांच्या याच नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार काही आमदारांसह शिंदे आणि भाजपच्या सरकारमध्ये सामील झाले आहेत. यामुळे महायुतीची ताकद वाढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. पुढे ते म्हणाले, देशाचे गृहमंत्री अमित शहा, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीत आगामी मावळ लोकसभेसाठी माझ्या नावावर शिक्कामोर्तब झाला असल्याचं खुद्द श्रीरंग बारणे यांनी म्हटलं असून त्या बैठकीला ते स्वतः उपस्थित होते.

पार्थ पवारसाठी पुन्हा मावळ लोकसभा मतदार संघ?

अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं बोललं जात आहे. परंतु, अद्याप ते कुठल्या मतदारसंघातून लढणार हे अस्पष्ट आहे. या अगोदर २०१९ मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत अजित पवार यांनी मावळ लोकसभा मतदार संघाची निवड केली होती. त्यामुळे ते पुन्हा एकदा मावळ लोकसभा मतदारसंघ निवडू शकतात. कारण, मावळमध्ये राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांच्यामुळे ताकद वाढल्याचं बोललं जात आहे. तसेच अजित पवार हे शिंदे आणि भाजप सरकारमध्ये सामील झाल्याने याचा विचार देखील केला जाऊ शकतो.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mp shrirang barne who defeated parth pawar reaction on ajit pawars revolt kjp 91 mrj