पिंपरी, चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील मतदानादरम्यान पिंपळेगुरव येथील माध्यमिक विद्यालय केंद्राबाहेर भाजपचे माजी नगरसेवक सागर आंगोळकर आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. त्यावर पराभव दिसू लागल्याने अशांतता पसरविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप शिवसेनेचे उपनेते, मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी केला.
हेही वाचा- “जनता माझ्या पाठीशी, त्यांचे आंदोलन म्हणजे स्टंटबाजी”; हेमंत रासने यांचा रविंद्र धंगेकरांना टोला
थेरगावातील संचेती प्राथिमक व माध्यमिक शाळेच्या मतदान केंद्रावर खासदार श्रीरंग बारणे यांनी पत्नी सरिता बारणे यांच्यासह मतदानाचा हक्क बजाविला. पोटनिवडणुकीत भाजप-शिवसेना महायुतीच्या उमेदवार अश्विनी जगताप यांच्यासाठी पोषक वातावरण आहे. त्या मोठ्या फरकाने विजयी होतील, असा आत्मविश्वास आम्हाला आहे. कै. लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक होत आहे. त्यांच्या धर्मपत्नीच्या पाठिशी मतदार आहे. ही तिरंगी नव्हे तर दुरंगी लढत आहे. निकाल ज्यावेळी येईल. त्यावेळी दुरंगीच लढत झाली असेल हे लक्षात येईल.
हेही वाचा- लंडनहून थेट कसब्यातील मतदान केंद्रावरच!
चिंचवडमध्ये भाजप-शिवसेनेचा मोठा मतदार असून तो जगताप यांच्या पाठिशी आहे. पिंपळेगुरव येथील हाणामारीबाबत बोलताना ते म्हणाले, ज्या उमेदवाराचा पराभव होतो. पराभव दिसू लागल्याने तो मतदान केंद्रात अशांतता माजविण्याचे काम करतो. तसाच तो प्रकार आहे. मतदारांनी मतदान केंद्रापर्यंत येऊ नये यासाठी अशांतता माजविण्याचे काम केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.