पुणे : राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे त्यांच्या संस्थेच्या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिल्या. कार्यक्रमासाठी पुण्यात आलेल्या सुप्रिया सुळे तातडीने मुंबईला बैठकीसाठी रवाना झाल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने यशस्विनी सन्मान पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम बालगंधर्व रंगमंदिर येथे बुधवारी आयोजित करण्यात आला होता. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार हे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे अध्यक्ष तर खासदार सुप्रिया सुळे कार्याध्यक्ष आहेत. पुरस्कार वितरणाच्या या कार्यक्रमाला शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे दोघेही उपस्थित राहणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते.

विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर राज्यातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शरद पवार कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याचे मंगळवारी रात्रीच स्पष्ट झाले होते. मात्र सुप्रिया सुळे संयोजक असल्याने त्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील, असे राष्ट्रवादी काँग्रेसकडून सांगण्यात आले होते. मात्र कार्यक्रमासाठी पुण्यात आलेल्या सुप्रिया सुळे या तातडीने मुंबईकडे रवाना झाल्या. राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुंबईत तातडीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीसाठी सुळे मुंबईकडे रवाना झाल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

Story img Loader