पिंपरी- चिंचवड : शहरातील कारभारी वेगळा असल्याने मी शहरात जास्त लक्ष देत नव्हते. आले तरी कार्यक्रम घेतला नाही. मला कोणाच्या कामात ढवळा-ढवळ करायला आवडत नाही. असं म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांना डिवचले आहे. सुप्रिया सुळे या पिंपरी- चिंचवडमध्ये बोलत होत्या. समरजीतसिंग घाटगे यांच्या मतदारसंघातील नागरिकांचा आज पिंपरी- चिंचवड शहरात मेळावा होता. या मेळाव्याला सुप्रिया सुळे यांनी संबोधित केलं.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, “एका ताटात जेवल्यास त्या व्यक्तीचं ऋण आयुष्यभर विसरू नये. तो व्यक्ती सोबत असो वा नसो, कारण त्याने आपल्या सुख-दुःखात साथ दिलेली असते.” पुढे, “सध्याचे राजकारण बघता ते बदलायला हवं. माझ्या आईला देखील सध्याचे राजकारण आवडत नाही. समाजात तेढ निर्माण होईल अशी भाषणे सध्या नेते करत आहेत. एक दिवस पोलिसांना घरी पाठवा मग बघतो.. हे कोण सांगणार?. हा देश संविधानावर चालतो. कुठल्या अदृश्य शक्तीच्या मनमानीवर चालत नाही. अशा धमक्या तुम्ही कोणाला देता.” असा टोला देखील त्यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला आहे.

आणखी वाचा- खड्डे न बुजविल्यास पुणे-मुंबई, पुणे-नगर रस्ते ताब्यात घेणार; नितीन गडकरी यांचा राज्य सरकारला ‘घरचा आहेर’

सुप्रिया सुळे यांनी सांगितल्या बारामती लोकसभेच्या कटू आठवणी

बारामती लोकसभेदरम्यान प्रत्येक संस्था माझ्या विरोधात होती. एक माणूस माझ्यासोबत नव्हता. आम्हाला बूथ कमिटीदेखील चोरून बनवावी लागत होती. अनेक ठिकाणी बूथ कमिटीला माणूस मिळत नव्हता. अनेक दशकांचे ऋणानुबंध असलेल्या व्यक्तीच्या आम्ही घरी गेलो होतो. त्या व्यक्तीने आमचा तोंडावर दरवाजा बंद केला होता. मतांच्या माध्यमातून त्यांनी राग व्यक्त केला. अशा कटू आठवणी देखील सुप्रिया सुळे यांनी सांगितल्या.