पुणे : माजी मंत्री एकनाथ खडसे हे स्नुषा रक्षा खडसे यांच्या विरोधात प्रचार करण्यासाठी तयार नसतील तर, त्यांच्यात अद्यापही सुसंस्कृतपणा आहे, असे म्हणावे लागेल, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अप्रत्यक्षपणे अजित पवार यांना चिमटा काढला. बारामती लोकसभा मतदारसंघात दुष्काळाची परिस्थिती आहे. तेथील समस्या सोडविण्यात व्यस्त असल्याने अन्य गोष्टीबाबत मला माहिती नाही, असे सांगत सुळे यांनी एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाबाबतच्या प्रश्नाला बगल दिली.वीज दर वाढीच्या निषेधार्थ महाविकास आघाडीकडून गुरुवारी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनानंतर सुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाविकास आघाडीचे पुण्यातील उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या शिक्षणाचा मुद्दा समाजमाध्यमातून चर्चेत आणण्यात आला आहे. यासंदर्भात बोलताना त्या म्हणाल्या की, धंगेकर यांच्याविरोधात बोलण्यासारखे भाजपकडे काही नाही. त्यामुळे नाहक मुद्दे उपस्थित केले जात आहेत. लोकांना देशामध्ये बदल हवा आहे. बेरोजगारीला नागरिक कंटाळले आहेत. केंद्रातील सरकार शेतकरी, कामगार आणि महिला विरोधातील आहे. हा बदल घडवून आणण्यासाठी महाविकास आघाडी प्रयत्नशील आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघात पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. मात्र दुष्काळासंदर्भात सरकार असंवेदनशील आहे. या परिस्थितीत राजकारण करण्यापेक्षा दुष्काळकडे लक्ष देणे मला आवश्यक वाटते, असे त्यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mp supriya sule criticizes ajit pawar regarding the campaign against snusha raksha khadsepune print news apk 13 amy