पुणे/ बारामती : बारामती तालुक्यातील अंजनगाव येथील महावितरण उपकेंद्राच्या उद्घाटन समारंभावरून नाराजी नाट्य घडले. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना ऐनवेळी निमंत्रण दिल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. या उपकेंद्राच्या कोनशिलेच्या उद्घाटनाच्या निमित्ताने खासदार सुळे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर बारामतीत पहिल्यांदाच एकत्र आले. मात्र, त्यांनी एकमेकांशी संंवाद साधला नाही. खासदार सुळे या मुख्य कार्यक्रमाला उपस्थित न राहता निघून गेल्या.
हेही वाचा >>> नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या पाच जणांविरुद्ध गुन्हे
लोकप्रतिनिधींना निमंत्रण पाठवताना राजशिष्टाचार पाळला न गेल्याने त्यांनी मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून नाराजी दर्शविली. या पत्राची प्रत त्यांनी जिल्हाधिकारी आणि महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना पाठविली आहे. लोकसभा निवडणुकीपासून खासदार सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एकत्र व्यासपीठावर आलेले नाहीत. विधानसभा निवडणुकीपूर्वी पुण्यातील एका शासकीय बैठकीच्या निमित्ताने ते एकत्र आले होते. अंजनगाव येथील महावितरणच्या उपक्रेंद्राच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात दोघे एकत्र दिसले. त्यांनी एकमेकांंशी स्मितहास्य केले. मात्र संंवाद साधला नाही. कोनशिलेचे उद्घाटन झाल्यावर खासदार सुळे या मुख्य कार्यक्रमाला उपस्थित न राहता निघून गेल्या. याबाबत खासदार सुळे म्हणाल्या, ‘बारामती लोकसभा मतदारसंघाचे आपण लोकप्रतिनिधी आहोत. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी लोकप्रतिनिधींना निमंत्रण पाठवताना राजशिष्टाचार पाळावा. किमान २४ तास आधी निमंत्रण मिळाले, तर त्या अनुषंगाने दौऱ्याचे नियोजन करता येते. अंजनगाव येथील कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका थोड्या वेळापूर्वी मिळाली. दौरे किंवा कार्यक्रम पूर्वनियोजित असतात. महत्त्वाच्या सार्वजनिक कार्यक्रमाची किमान २४ तासांपूर्वी कल्पना दिली, तर नियोजित कार्यक्रमात बदल करता येणे शक्य आहे. संबंधित यंत्रणांनी याची नोंद घ्यावी.’