पुणे : ‘जगभरात कच्च्या तेलाच्या (क्रूड ऑईल) बॅरलच्या दरामध्ये घसरण होत असताना त्याचा लाभ सरकारने सामान्य नागरिकांना दिला पाहिजे. गॅस सिलिंडरच्या दरामध्ये वाढ कशासाठी केली गेली,’ असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी उपस्थित केला. महात्मा फुले जयंतीनिमित्त समता भूमी येथील महात्मा फुले वाडा येथे भेट देऊन सुप्रिया सुळे यांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) शहराध्यक्ष प्रशांत जगताप आणि प्रवक्ते अंकुश काकडे या वेळी उपस्थित होते. गॅस सिलिंडरच्या दरवाढीसंदर्भात केंद्र सरकारला पत्र लिहिणार असल्याचे सुळे यांनी सांगितले.
‘बनेश्वर रस्त्याचा विषय हा राजकीय नाही, तर श्रद्धेचा आहे. यासंदर्भात सरकार सकारात्मक विचार करत असेल, तर त्याचे मी स्वागत करते,’ अशी टिप्पणी सुळे यांनी केली. बनेश्वर येथील रस्त्याच्या विषयासंदर्भात माझ्या बहिणीवर उपोषणाची वेळ येऊ नये, यासाठी अधिकाऱ्यांना योग्य सूचना दिल्या असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. त्यासंदर्भात सुळे यांनी ही टिप्पणी केली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शनिवारी (१२ एप्रिल) रायगडला भेट देणार आहेत, याकडे लक्ष वेधले असता, सुळे म्हणाल्या, ‘ते देशाचे गृहमंत्री आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी येत असतील, तर ‘अतिथी देवो भव’ या उक्तीनुसार त्यांचे स्वागतच आहे.’ रायगडावरील वाघ्या श्वानाचा पुतळा हटविण्याच्या मागणीसंदर्भात विचारले असता, सुळे म्हणाल्या, ‘यासंदर्भात माझी कोणतीही भूमिका नाही. राजकारण आणि इतिहास याची गल्लत करता कामा नये. त्या संदर्भात इतिहासकारांनी बोलावे असे मला वाटते.’
एकतर्फी प्रेमातून लग्नासाठी तगादा लावल्याने आणि कुटुंबीयांना संपविण्याची धमकी दिल्याप्रकरणी बारामती येथील एका युवतीने आत्महत्या केल्याच्या घटनेकडे लक्ष वेधले असता, सुळे म्हणाल्या, ‘या प्रकरणाची संपूर्ण माहिती अजून माझ्याकडे आलेली नाही. पण, राज्यातील महिला आणि युवतींवर अन्याय-अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. त्यांच्या सुरक्षेसंदर्भात योग्य उपाययोजना करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलवावी, अशी मागणी मी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहे.’
‘गोड बातमीने आनंद’ ‘आमच्या घरात एक लेक येत आहे याचा आनंद आहे,’ अशा शब्दांत सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांच्या साखरपुड्याच्या उपस्थितीसंदर्भात भाष्य केले. ‘भारतीकाकी यांच्या निधनाच्या दु:खातून कुटुंब सावरत असताना या गोड बातमीने आनंद झाला. त्यानिमित्ताने आशाकाकींना भेटता आले,’ असेही त्या म्हणाल्या.