दुष्काळामुळे निर्माण झालेल्या उजनी धरणातील पाणीटंचाईमुळे गेल्या तीस वर्षांपासून इंदापूर तहसील कार्यालयाच्या आवारातील जुन्या वृक्षावरील सारंगाराकडे या वर्षी चित्रबलाक पक्ष्यांनी पाठ फिरवल्याने नेहमी पक्ष्यांच्या वास्तव्याने गजबजणारे त्यांचे सारंगार या वर्षी ओस पडले आहे. या विषयाचे वृत्त शुक्रवारच्या ‘लोकसत्ता’त प्रसिद्ध होताच बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या वृत्ताची दखल घेऊन तातडीने ओस पडलेल्या सारंगाराला भेट देऊन पाहणी केली.
यावेळी त्या म्हणाल्या, कोणत्याही प्रकारचा उपद्रव नसणाऱ्या या पक्ष्यांच्या वास्तव्याने इंदापूरच्या सौंदर्यात नक्कीच भर पडत आहे. उजनी धरणावरही पाणलोट क्षेत्रामध्ये रोहित पक्ष्यांचे काही महिने वास्तव्य असते. इंदापूर तहसील कार्यालयाच्या आवारातील चित्रबलाक पक्ष्यांचे ‘सारंगार’ जपण्यासाठी काही उपाययोजना करता येतील का, याबाबत प्रांताधिकारी विजयसिंह देशमुख व इंदापूरचे तहसीलदार संजय पवार, डी. एन. जगताप, प्रतापराव पाटील, सीमा कल्याणकर यांच्याशी त्यांनी चर्चा केली. या दरम्यान ‘लोकसत्ता’च्या प्रस्तुत प्रतिनिधीकडूनही या पक्ष्यांच्या वास्तव्याबाबत त्यांनी सविस्तर माहिती घेतली.
या वर्षीच्या दुष्काळामुळे पर्यावरणाची मोठी हानी झाली असून, पशू-पक्ष्यांनाही त्याची झळ बसू लागल्याचे त्यांनी नमूद करून येत्या पाऊसकाळात चांगले पर्जन्यमान होऊन भूगर्भातील पाण्याच्या पातळीसह सृष्टी पुन्हा बहरेल असा आशावादही यावेळी त्यांनी व्यक्त केला.
 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा